राहाता (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील एका ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुष्पा विजय मदने (वय ४० वर्षे, रा. एकरुखे, ता. राहाता) असे मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास पुष्पा मदने यांना गुप्त अंगातून तीव्र रक्तस्त्राव सुरू झाल्याने राहाता येथील डॉ. मैड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता, महिलेने पूर्वीच गर्भपाताच्या गोळ्या घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ गर्भपिशवी साफ करून (क्युरेटिंग) त्यांच्यावर उपचार सुरू केले.
उपचारादरम्यान रुग्णाने दुपारी दोन वेळा लघवी केली व काही प्रमाणात प्रकृतीत सुधारणा दिसून आली. मात्र काही वेळातच त्यांचा रक्तदाब अत्यंत खालावला. डॉक्टरांनी रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी औषधोपचार केले. सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास रुग्णाची प्रकृती पुन्हा खालावली व त्या बेशुद्ध झाल्या. हृदयाची हालचाल मंदावल्याने डॉक्टरांनी तात्काळ व्हेंटिलेटर सुरू केले, परंतु सर्व प्रयत्नांनंतरही रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या डेथ मेमो अन्वये राहाता पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. राहाता पोलीस स्टेशनमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू (अ.मृ. रजि. नं. ८९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मपोहेकॉ २३१३ व्ही. एस. मोरे करीत आहे.




