दिल्ली । Delhi
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारमधून ‘व्होट अधिकार यात्रा’ला सुरुवात केली असून या यात्रेतून त्यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला आहे. 16 दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान ते सुमारे 1,300 किलोमीटरचा प्रवास करणार असून 20 जिल्ह्यांमधून ते जनतेशी संवाद साधतील. ही मोहीम रोहतास जिल्ह्यातून सुरू झाली असून अंतिम टप्पा पाटण्यात होणार आहे.
यात्रेच्या पहिल्याच टप्प्यात राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील निवडणुकांचे उदाहरण देत भाजपा आणि निवडणूक आयोगावर मतदान चोरीचे आरोप लावले. ते म्हणाले, “महाराष्ट्रात एक कोटी नवीन मतदारांची नोंद झाली. कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघात एक लाखाहून अधिक मते चोरीला गेली आणि भाजपाचा उमेदवार विजयी झाला.”
राहुल गांधींचा आरोप आहे की भाजपा ज्या मतांवर जिंकते, ती मुख्यत्वे नव्याने नोंद झालेल्या मतदारांकडून मिळतात. काँग्रेसने या संदर्भात चौकशी केली असून त्याचा अहवालही तयार केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या तक्रारीची नोंद निवडणूक आयोगाकडे करून व्हिडीओ रेकॉर्डिंग मागवण्यात आले, मात्र आयोगाने ते दाखवण्यास नकार दिला.
“आम्ही स्वतः सर्व रेकॉर्ड तपासले आणि त्यांची तुलना केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने माझ्याकडून एफिडेविट मागितले. आज देशभरातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पद्धतशीररीत्या चोरील्या जात आहेत. आता त्यांची पुढची योजना बिहार निवडणुका चोरी करण्याची आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, SIR प्रणालीमुळे मतदानाचा हक्क हिरावला जात असून गरीब व दुर्बल लोकांचे अधिकार धोक्यात आले आहेत. “गरीब आणि कमजोर लोकांकडे फक्त मतदानाचा अधिकार आहे. आम्ही तो चोरीला जाऊ देणार नाही. बिहारची जनता देखील भाजपाला हा कट यशस्वी करू देणार नाही,” असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी म्हटले की, आता संपूर्ण देशाला हे स्पष्ट झाले आहे की निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार घडत आहेत. “आधी ही गोष्ट लोकांना ठाऊक नव्हती, पण आम्ही पत्रकार परिषदेत सर्व पुरावे दाखवले. जिथे कुठे निवडणूक चोरी होत आहे, तिथे आम्ही ती उघड करू,” असे ते म्हणाले.




