दिल्ली । Delhi
रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेरिकेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. ब्राऊन विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात एका शीख तरुणाने ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी काँग्रेसची चूक मान्य करत जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या विधानावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
कार्यक्रमादरम्यान शीख तरुणाने 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार, शीख समुदायावरील अत्याचार आणि काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मला वाटत नाही की शीख समुदाय कोणत्याही गोष्टीला घाबरतो. 80 च्या दशकात जे काही घडलं ते चूक होतं. काँग्रेसच्या वतीने ज्या चुका झाल्या त्याची जबाबदारी घेण्यासाठी मी तयार आहे.”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी अनेक वेळा सार्वजनिक मंचांवर म्हटलं आहे की ते काळात जे घडलं ते चुकीचं होतं. मी स्वतः सुवर्ण मंदिरात अनेकदा गेलो आहे. माझं शीख समाजाशी चांगलं नातं आहे.” त्या तरुणाने काँग्रेसच्या कारकिर्दीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्याचा आरोप करत विचारलं की, “तुम्ही शीखांविषयी बोलता, पण भीती दाखवता की भाजप काय करणार? आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे. पण ते काँग्रेसच्या काळात नव्हतं.” तसेच, “सज्जन कुमार यांना कोर्टाने शिक्षा दिली, पण काँग्रेसमध्ये आजही अशा अनेक नेते आहेत,” असा आरोपही त्या तरुणाने केला. या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधींनी काँग्रेसच्या चुकीची जबाबदारी घेत असल्याचं सांगितल्याने त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे भारतात राजकीय वादाच्या नव्या लाटेला तोंड फुटलं आहे.
भाजपकडून राहुल गांधींवर जोरदार टीका सुरू झाली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “आता राहुल गांधी यांच्यावर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही टीका होऊ लागली आहे.” तर इतर भाजप नेत्यांनी राहुल यांचं विधान ‘राजकीय सर्कस’ असल्याचं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. काही नेत्यांनी टीका करत म्हटलं की, “राहुल गांधी अजूनही नम्र झालेले नाहीत. त्यांनी आजवर माफी मागितलेली नाही. त्यांचं नेतृत्व फसवं आणि दिशाहीन आहे.”