Tuesday, September 29, 2026
HomeराजकीयABVP च्या कार्यकर्त्यांनी 'त्या' मुलीवर दबाव टाकला, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

ABVP च्या कार्यकर्त्यांनी ‘त्या’ मुलीवर दबाव टाकला, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

पुणे । Pune

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यात आयोजित ‘छात्रों की गूंज’ या बहुचर्चित कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शहरातील मानाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (COEP) शुक्रवारी रात्री काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

शनिवारी पुण्यात राहुल गांधी देशभरातील विद्यार्थ्यांशी आणि तरुणांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारी दरम्यान एका विद्यार्थिनीने आपल्या शैक्षणिक समस्या मांडण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, काँग्रेस नेत्यांच्या आरोपानुसार, सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी या विद्यार्थिनीवर तिचे वक्तव्य मागे घेण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी मोठा मानसिक दबाव आणला गेला.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकारावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, “ज्या मुलीने अत्यंत मोकळेपणाने आणि धैर्याने आपले प्रश्न मांडले होते, तिला बंद दाराआड धमकावून तिचे वक्तव्य मागे घ्यायला लावणे हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. १५ वर्षांच्या मुलीला माफी मागायला लावण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या जुन्याच पद्धतीचा अवलंब इथेही केला गेला. सत्य बोलूनही ज्या त्रासाला त्या विद्यार्थिनीला सामोरे जावे लागले, त्याबद्दल मी एका पालकाच्या नात्याने तिची जाहीर माफी मागतो.”

या गोंधळानंतर सीओईपी कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. “देशात आज बोलण्याचे आणि आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य उरलेले नाही. आमचे कार्यकर्ते केवळ त्या मुलीला संरक्षण देण्यासाठी आणि वातावरण शांत करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत उलट आमच्याच कार्यकर्त्यांवर लाठीमार केला,” असा थेट आरोप त्यांनी केला.

पोलीस कारवाईत युवक काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली असून एका कार्यकर्त्याच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. जखमी कार्यकर्त्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “उलटा चोर कोतवाल को डांटे असा हा सगळा प्रकार असून पोलीस निष्पक्ष कारवाई करण्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, पण सर्व दिवस सारखे नसतात; खोट्या गुन्ह्यांचे प्रायश्चित्त येणाऱ्या काळात सर्वांना भोगावेच लागेल,” असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाचे कारण पुढे करत स्वतःचा अजेंडा राबवणे गैर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात...