नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. दरवर्षी अनेक शेतकरी नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतात. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सरकार शेतकऱ्यांचा नाही, तर श्रीमंतांचा विचार करते. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते, परंतु आज शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे,’ अशी टीका राहुल यांनी केली.
तीन महिन्यात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या
एक्सवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी सरकारवर कर्जमाफी आणि पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांनी लिहिले की, “कल्पना करा… महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही. ही ७६७ उद्ध्वस्त घरे आहेत. ७६७ कुटुंबे जी कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार? गप्प आहे. उदासीनतेने पाहत आहे.” ‘शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत’
शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहे
राहुल गांधी म्हणाले की, “शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत आहेत, बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे.. पण किमान आधारभूत किमतीची हमी नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ज्यांच्याकडे कोटी आहेत? मोदी सरकार त्यांचे कर्ज सहजपणे माफ करते. आजच्या बातम्या पहा, अनिल अंबानींचा 48 हजार कोटी रुपयांचा एसबीआय घोटाळा.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु पण आज…
“मोदीजी म्हणाले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचे आयुष्यच संपत चालले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांचा जीव घेत आहे आणि मोदीजी आपल्याच प्रसिद्धीचा (पीआर) तमाशा पाहत आहेत.”, अशी बोचरी टीकाही राहुल गांधी यांनी केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




