दिल्ली । Delhi
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव सध्या “व्होट अधिकार यात्रा”च्या निमित्ताने बिहार दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते सतत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करत आहेत. आज अररिया येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा सरकारवर तसेच आयोगावर टीकेची झोड उठवली.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट आरोप केला की, देशभरात मोठ्या प्रमाणावर मतचोरी होत आहे आणि निवडणूक आयोग मात्र यावर मौन बाळगून आहे. “कोट्यवधी लोक आज असा विश्वास ठेवत आहेत की, मते चोरीला जात आहेत. आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणामधील मतदार यादी मागितली, मात्र ती आम्हाला दिली गेली नाही. कर्नाटकमध्ये मते कशी चोरीला जातात हे आम्ही उघड केले, पण बिहारमध्ये हे घडू देणार नाही,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, “मी कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघातील डेटा निवडणूक आयोगासमोर ठेवला. तिथे जवळपास एक लाख बनावट मतदार आढळले. याबाबत आयोगाला विचारले असता अद्याप उत्तर मिळालेले नाही. एवढेच नव्हे तर आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, पण अनुराग ठाकूर यांनीही याच विषयावर विधान केले असूनही त्यांच्याकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र मागण्यात आले नाही. यातून आयोगाचा पक्षपात उघड होतो.”
बिहारमधील SIR या प्रक्रियेचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, “ही संस्थात्मक मतचोरीची पद्धत आहे. बिहारमध्ये तब्बल ६५ लाख लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली, पण भाजपकडून यावर एकही तक्रार आलेली नाही. कारण भाजप, निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त यांच्यात थेट भागीदारी आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, राजद नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “आज निवडणूक आयोग ‘गोदी आयोग’ झाला आहे. तो एक लॅपडॉग आयोगासारखा वागत आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यासारखे काम करत आहे. आयोगाची निष्पक्षता आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे.”
यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. “आजपर्यंत आम्ही इतका खोटारडा पंतप्रधान कधीच पाहिला नाही. अफवा पसरवणे हेच त्यांचे मुख्य काम झाले आहे. बिहारमध्ये आल्यानंतर त्यांनी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला, मात्र आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात घुसखोराचे एकही नाव नाही,” असे वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केले.
राहुल गांधी व तेजस्वी यादव यांच्या या आरोपांमुळे बिहारच्या राजकीय वातावरणात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या विधानांमुळे पुढील काही दिवसांत राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.




