राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
केंद्रातील भाजपा सरकारने केलेले शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावेत या प्रमुख मागणीसाठी
व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी जात असताना काल उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध करीत राहुरी येथे मार्केट कमिटी समोर नगर-मनमाड महामार्गावर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंनी आंदोलन केले
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, अॅड.पंढरीनाथ पवार, राजेंद्र बोरुडे, बाबासाहेब धोंडे, नानासाहेब कदम, कारभारी ढोकणे, सुनील कदम, संजय पोटे आदींसह शेतकरी, कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आंदोलकांच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी निवेदन स्वीकारले.
जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली धक्काबुक्की म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारच्या दडपशाहीचा लाजिरवाणा नमुना आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दोघेही उत्तरप्रदेशमधील दलित आणि मागासवर्गीय समाजावर होणार्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवित आहेत. हाथरसमधील अत्याचार आणि खुनाची घटना घृणास्पद आहे.
भारतामधील लेकींना न्याय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला चिरडणे म्हणजे लोकशाही मूल्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यासारखे आहे. सत्तेचा गैरवापर करीत असलेल्या भाजपच्या केंद्रातील आणि उत्तर प्रदेशमधील जुलमी राजसत्तेला जनता आता धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
या घटनेचा तीव्र निषेध करतो असेही चव्हाण म्हणाले. तर केंद्र सरकार काळे कायदे करून शेतकरी आणि कामगारांना देशोधडीस लावत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, संजय पोटे व राजेंद्र बोरुडे यांची भाषणे झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेण्याच्या घटनेचा काँग्रेसच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.