मुंबई | Mumbai
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर (Gujarat Tour) आहेत. या दौऱ्यात त्यांनी पक्ष संघटनेची बैठक घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र या बैठकीत ते पक्षातील नेत्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) काँग्रेसचा नक्की विजय होणार, असे म्हणत राहुल गांधी यांनी पक्ष संघटनेतील मरगळ झटकून टाकण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, “मी काँग्रेस (Congress) पार्टीचा सदस्य आहे आणि मीच म्हणतोय की गुजरातचा काँग्रेस पक्ष वाट दाखवण्यास असमर्थ आहे. मी ही गोष्ट कोणत्याही भितीपोटी बोलत नाही. पक्षाचे कार्यकर्ते असोत, राहुल गांधी असो, पक्षाचे महासचिव असोत किंवा आमचे पीसीसी अध्यक्ष असोत आम्ही सगळेच गुजरातला वाट दाखवण्यात असमर्थ आहोत”, अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की,” गुजरातमधील व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, मजूर, विद्यार्थी (Student) यांना आता पर्याय हवा आहे. त्यांना ‘बी’ टीम नको आहे. पक्षात जे दोन गट पडले आहेत, त्यात विभागणी करणे, ही माझी जबाबदारी आहे. पहिले काम म्हणजे दोन गटांना वेगळे करायचे. यासाठी कडक कारवाई करावी लागली. १०, १५, २० किंवा ३० लोकांना काढावे लागले तरी आपण त्यांना काढून टाकू. भाजपासाठी काँग्रेसमध्ये राहून काम करतात. त्या लोकांना बाहेर काढून खुलेपणाने काम करण्यास मोकळीक देऊ. तुम्हाला तिथे काहीही किंमत मिळणार नाही, ते तुम्हाला बाहेर फेकतील”, अशी भावना राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, “आपला जिल्हाध्यक्ष (District President) प्रभाग अध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेता असो, त्याच्या हृदयात काँग्रेस असायला हवी. विजय किंवा पराभवाची गोष्ट सोडा. काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा नेता, त्याचा हात जर कापला तर त्यातूनही काँग्रेस वाहायला हवी. संघटनेचे नियंत्रण अशा एकनिष्ठ लोकांच्या हातात जायला हवे. आपण जेव्हा हे काम करू, तेव्हा गुजरातमधील जनता वादळाप्रमाणे आपल्या संघटनेत सामील होण्याचा प्रयत्न करेल,” असेही राहुल गांधींनी म्हटले.