Friday, November 1, 2024
Homeभविष्यवेधविश्वचषकाच्या स्वप्नासाठी राहुलचे तारे पुरक!

विश्वचषकाच्या स्वप्नासाठी राहुलचे तारे पुरक!

राहुल द्रविड हे भारताचे माजी क्रिकेटपटू व भारतीय संघाचे माजी कर्णधार. सध्या ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच आहेत. क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून त्यांना ओळखले जाते. राहुल यांनी वयाच्या 12 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 2000 साली विस्डेन क्रिकेटर्सच्या मानांकनात सर्वोत्कृष्ट पाच फलंदाजांमध्ये त्यांचा समावेश होता. 2004 मध्ये सुरू झालेल्या पहिल्याच आयसीसी पुरस्कार समारंभात सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूच्या पुरस्काराने त्यांना सन्मान झाला होता.

राहुल यांचा जन्म जन्म 11 जानेवारी 1973 रोजी मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले. राहुल यांची मातृभाषा मराठी आहे. त्यांनी बंगळूर येथील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले, तर सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. सेंट जोसेफ कॉलेज येथे एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. एप्रिल 2016 पर्यंत ते कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर, रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिसनंतर चौथे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी दहा हजार धावा करणार्‍या सचिन तेंडूलकर यांच्यानंतर राहुल भारताचे दुसरा क्रिकेटपटू. त्यांनी 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक केल्यानंतर, सर्वच्या सर्व दहा कसोटी खेळणार्‍या देशाविरोधात शतके करणारे ते जगातील पहिले फलंदाज बनले. एप्रिल 2016 पर्यंत यष्टीरक्षणाव्यतिरीक्त, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी एकूण 164 सामन्यांत 210 झेल घेतले आहेत.

- Advertisement -

सिडनी येथे 1 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या सातव्या वार्षिक ब्रॅडमॅन पुरस्कार सोहळ्यात राहुल द्रविडचा, ग्लेन मॅक्ग्रासोबत सन्मान करण्यात आला होता. भारत सरकारद्वारा दिल्या जाणार्‍या पद्मश्री आणि पद्म भूषण या अनुक्रमे चवथ्या आणि तिसर्‍या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

दि वॉल…पण का?

इडन गार्डन मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना चांगलाच गाजला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा पहिला डाव 171 धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियाला 274 धावांची आघाडी मिळाली. अपेक्षेनुसार स्टीव्ह वॉने भारताला फॉलो-ऑन दिला. फलंदाजांनी दुसर्‍या डावात पहिल्यापेक्षा चांगले प्रदर्शन करूनही, भारतीय संघाला पराभव समोर दिसत होता. द्रविड 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा धावफलकावर 4 बाद 232 धावा लागल्या होत्या आणि डावाचा पराभव टाळण्यासाठी भारताला अजूनही 42 धावांची गरज होती. 3र्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लक्ष्मणच्या साथीने द्रविडने आणखी पडझड होऊ न देता दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवला. दिवसाच्या शेवटी भारताच्या 4 बाद 254 धावा झाल्या ज्यात लक्ष्मण 109 आणि द्रविड 7 धावांवर नाबाद होता. परंतु चौथ्या दिवशी जे घडले त्यामुळे लक्ष्मण आणि द्रविडचे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचे कोरले गेले. लक्ष्मण आणि द्रविडने बाद न होता संपूर्ण दिवस फलंदाजी केली. स्टीव्ह वॉने तब्बल 9 गोलंदाज वापरले, परंतु लक्ष्मण आणि द्रविडने मॅकग्रा-वॉर्न आणि कंपनीला भीक न घालता धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला त्यांनी पूर्णपणे निष्प्रभ केले. पाचव्या दिवशी लक्ष्मण त्रिशतकाच्या जवळ असताना 281 धावांवर तंबूत परतला आणि 375 धावांची ऐतिहासिक भागीदारी संपुष्टात आली. द्रविडने 180 धावांवर काढल्या. कर्णधार गांगुलीने 7 बाद 657 या धावसंख्येवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 75 षटकांमध्ये 384 धावांचे आव्हान दिले. लक्ष्मण-द्रविडच्या भागीदारीने भारतासाठी सामनाच खेचून आणला नाही तर संघामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला. प्रेरणा मिळालेल्या भारतीय संघाने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियाला 68.3 षटकांमध्ये 212 धावांवर सर्वबाद केले. भारताने सामना 171 धावांनी जिंकला. फॉलो-ऑन मिळाल्यानंतर सामना जिंकणार भारत जगातील दुसरा संघ बनला. पुढेही द्रविडची कसोटी कारकीर्द बहरत गेली व प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर द्रविडची चिवट फलंदाजी म्हणजे अभेद्य भिंतच ठरू लागली. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘द्रविड : दि वॉल’ हे बिरूद जगमान्य झाले.

भविष्यवेधमधील जवळ जवळ सर्व लेखांतून मी अंगठ्याचे कारकत्व विशद करत आलो आहे. हस्तसामुद्रिकशास्त्र हे फक्त हातांवरील रेषांचे शास्त्र नव्हे तर ते हाताचा बोटांचा व ग्रहांचा आकार, चिन्ह, बोटांच्या पहिल्या पेरावरील ठसे, अंगठा तीळ, तळहातावरील त्वचेचा पोत, तळहातावरील रंगाची अभा, नखे इत्यादी अनेक बाबींचा एकत्रित अभ्यास आहे. नुसता अंगठा हातावर मजबूत असता अश्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात नशिबाची साथ नसेल तरीही निग्रहाने, अपार कष्टाने ध्येयाने प्रेरीत होऊन जीवनात यशश्री खेचून आणतात.

उजव्या हातावरील मजबूत, निर्दोष व भाग्यकारी अंगठा

मानवाला मजबूत भाग्यकारी प्रदान असलेला अंगठा हि ब्रह्माचीच निर्मिती आहे व त्याची प्राप्ती नशिबानेच मिळत असते. शंभर व्यक्तीमध्ये पांच व्यक्तींच्या हातावरील अंगठा निर्दोष व मजबूत असतो व उरलेल्या 95 व्यक्तींच्या हातावरील अंगठ्यात व पर्यायाने व्यक्तींच्या व्यक्तिमत्व किंवा स्वभावात काहीना काही दोष व उणीव दिसून येतात व या उणिवा फक्त अंगठ्याच्या ठेवणीवरून प्रगट होतात. हस्तसामुद्रिकशास्त्रात अंगठ्याचे महत्व खूप मोठे आहे, अंगठा बलवान असता व्यक्तीत निर्णय क्षमता असते, ते दुसर्‍याच्या अधिपत्याखाली काम करीत नाही. या शास्त्रात अंगठ्यालाच नव्हे तर संपूर्ण हाताचा पंजा, हातावरील बोटे त्यांचा आकार यांना महत्व आहे. हातांच्या व बोटांच्या आकारावरून व्यक्तीचे एकंदरीत व्यक्तिमत्व कळते. सामुद्रिकशास्त्रात अंगठा व त्याच्या ठेवणीला, त्यावर असलेले पेरे, त्यांचा आकार, पेर्‍यांवरील आडव्या रेषा व अंगठा हाताच्या मनगटापासून असेल व पहिल्या बोटाच्या तिसर्‍या पेराच्या मध्यापर्यंत लांबीला असेल तर तो प्रमाणात मानतात. अंगठा लेचापेचा, शक्तीहीन असेल तर व्यक्तीला निर्णय क्षमता नसते ती दुसर्‍याच्या अधिपत्याखाली कायम राहते.

आज आपण राहुल द्रविड यांच्या उजव्या हातावरील अत्यंत कणखर, भाग्यशाली व प्रभावशाली आंगठ्याचे, अंगठ्याच्या व पेरांच्या आकाराचे एकत्र कारकत्व अभ्यासणार आहोत. त्याद्वारे वाचकांना अंगठ्याची महिमा किती? हे कळणार आहे. प्रत्येक बोटाला तीन पेरे असतात. अंगठ्याला सुदधा तीन पेरे असतात. परंतु तिसरे पेर हे खूप आकाराला छोटे किंवा ते नसेल तर तिसरे पेर हे शुक्र ग्रहात विलीन झालेले समजतात. बहुतेक अंगठ्यावर दोन पेरे मोठे असतात. नखाच्या मागचे पहिले पेर हे विचारशक्ती, कल्पना, संकल्पना यांचे असते. पहिले पेर दुसर्‍या पेरापेक्षा रुंदीला खूप मोठे असेल तर, कल्पनाविश्व मोठे असते व कामाचा उरक नसतो. अंगठ्याचे पहिले पेर दुसर्‍या पेरापेक्षा हे नेहमीच मोठे असते. द्रविड यांच्या अंगठ्यावरील पहिले व दुसरे पेर हे आदर्शवत आहे. दोनही पेरे स्वच्छ आहेत त्यावर आडव्या रेषा नाहीत. अंगठ्याच्या पेरांवर आडव्या रेषा असतील तर त्या व्यक्तीच्या विचारात व कृतीत नेहमी संभ्रम व अडथळा आणतात. द्रविड यांच्या हातावरील दुसरे पेर हे प्रमाणात असल्याने आलेल्या विचारांना लगेचच आळस न करता कृतीत आणण्यासाठीचे काम करते.

अंगठ्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या पेरावरील सांध्यावर फक्त आडव्या दोन रेषा किंवा एक आडवी रेषा असता धनाची कमतरता असते. आर्थिक कसरत आयुष्यभर राहते. मात्र पहिल्या पेरानंतर आडव्या रेषेऐवजी गव्हाच्या आकारासारखे यवाचे चिन्ह असेल तर त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात धनाची कमतरता नसते. तिच्या सर्व गरजा पूर्ण होत असतात. या वैशिष्ट्यामुळेच हातावरील अंगठ्याचे महत्व किती आहे हे लक्ष्यात येते. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे द्रविड यांचा अंगठा मजबूत व पेरे प्रमाणशीर असल्याने त्यांचेकडे, स्थितप्रज्ञता, संयम, सातत्य, मेहेनत, निर्णय यांचा मिलाफ असल्याने त्यांनी क्रिकेट खेळात कठोर प्रयत्न करून यश मिळविले. कठोर परिश्रमाबरोबरच भाग्य प्रबळ लागते. त्यानुसार द्रविड यांच्या हातावरील रवी रेषेचा उगम हा भाग्य रेषेतून होत आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मान सन्मान, कीर्ती प्रसिद्धी मिळाली आहे. आंतराष्ट्रीय प्रसिद्धीसुद्धा रवी रेषा प्रदान करते. तिसर्‍या व चवथ्या बोटांच्या पेरांमधून एक रेषा तिरकी निघून रवी रेषेत विलीन होत आहे ही रेषा दूरदेशी कीर्ती प्रसिद्धी देत आहे.

उजवा मजबूत हात

द्रविड यांचा उजवा हात मजबूत बांध्याचा आहे. या हातावरील हृदय रेषा मस्तक रेषेत जाऊन मिळत आहे. त्यामुळे द्रविड हे प्रेमळ अंतकरणाचे आहेत. हृदय रेषेचा एक फाटा रवी रेषेतून उगम पाऊन तो पहिल्या व दुसर्‍या बोटांच्या पेरोमधे जाऊन थांबल्याने द्रविड हे व्यवहारी झाले आहेत. त्यांना त्यांचा स्वार्थ कश्यात आहे ते कळते, भावना प्रधान असले तरी त्यांचे निर्णय भावनेच्या भरात होत नाहीत. मणिबंधा कडून तळहातावर भाग्य रेषेत विलीन होणार्‍या दोन छोट्या रेषा आहेत. एक रेषा चंद्र ग्रहावरून व दुसरी आयुष्य रेषेच्या जवळून उगम पाऊन, मुख्य भाग्यरेषेत जाऊन मिळाल्या आहेत. तेथून पुढे भाग्य रेषा अखंड पणे शनी ग्रहाच्या बोटाच्या सानिध्यात थेट शनी ग्रहावर मधोमध गेल्याने द्रविड यांचे बालपणी व तरुण वयात कमवायला लागेपर्यंत आर्थिक झळा सोसाव्या लागल्या नाहीत. अंगठ्याच्या आत खालच्या मंगळ ग्रहावर मस्तक रेषेतून नागमोडी रेषा अंगठ्याच्या मूळापर्यंत उतरल्याने द्रविड यांना क्रोधाची मात्रा अधिकची आहे. परंतु अंगठ्याच्या वैशिष्ठयपूर्ण ठेवणीमुळे व वरचा मंगळ यांच्या शुभ कारकत्वाने त्यांचे क्रोधावर नियंत्रण आले आहे. रवी रेषा व भाग्य रेषेला सांधणारी एक आडवी रेषा रवी व शनी ग्रहावर आहे. हि रेषा द्रविड यांना कीर्ती प्रसिद्धीच्या मागे त्यांची आर्थिक उन्नती करीत आहे. हातावर अंगठ्याला लागून असणारे खालचा मंगळ व शुक्र ग्रह यांना विभाजित करणारी आडवी रेषा, आयुष्य रेषेपासून थेट अंगठ्याच्या पेरात हि रेषा आडवी गेल्याने द्रविड हे दोन मूड मधे असतात. वरच्या मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली ते अस्वस्थ व क्रोधीत असतात तर शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली ते आनंदी असतात व याच कारणाने त्यांचा मुड हा दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ बदलत असतो.

द्रविड यांच्या आयुष्यात त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा आहे तरी त्यांना भाग्याची साथ आहे. भारतीय क्रिकेट संघात निवड होणे हि त्यांच्या जीवनातील मोठा भाग्याचा क्षण होता व त्यामुळेच त्यांना त्यांचे क्रिकेटचे कौशल्य दाखविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. द्रविड यांनी त्यांच्या जीवनात क्रिकेटच्या निवृत्तीनंतर सुद्धा कधीच मागे वळून पहिले नाही. 19 वर्षा खालील भारतीय क्रिकेट संघाचे त्यांनी यशस्वीपणे नेतृत्व केले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक खेळाडू घडवले. सध्या ते भारताच्या वरिष्ठ संघाची धुरा प्रशिक्षक म्हणून त्यांचे खांद्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वचषक स्पर्धेत विजयपथावर आहे. द्रविड यांचे मुख्य प्रशिक्षकाचे अत्यंत जिकरीचे व मेहनतीचे काम त्यांच्यावर भारतीय क्रिकेट बोर्डाने सोपवले आहे. भारताने एकदिवशीय क्रिकेट विश्वचषक जिंकावा ही त्यांची मनोमन इच्छा व स्वप्न आहे. ते फलद्रुप होताना दिसते आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या