Tuesday, October 6, 2026
Homeक्राईमAhilyanagar : राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापकाला 3 कोटींचा गंडा!

Ahilyanagar : राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापकाला 3 कोटींचा गंडा!

शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अनोळखी नंबरवरून संपर्क केलेल्या व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये घेऊन त्यावर शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेऊन राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापकाने तब्बल 3 कोटी 3 लाख 15 हजार रूपयांचे शेअर्स व आयपीओ खरेदी केले. मात्र काही दिवसांनी परतावा मिळाला नाही व गुंतवणूक केलेली रक्कमही परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित प्राध्यापकाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी साक्षी गुप्ता, जितेन दोषी व विक्रम शहा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व इतर अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

61 वर्षीय फिर्यादी सावेडी उपनगरातील रासनेनगर येथे राहतात. ते राहुरी कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. त्यांना 2 ऑगस्ट 2025 रोजी ‘1999 इनाम मुव्हिंग फॉरवर्ड’ नावाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये त्यांच्या संमतीशिवाय सामील करण्यात आले. या गु्रपवर जितेन दोशी नावाचा इसम शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या स्टॉक बाबत व त्यातून झालेल्या फायद्याबाबत माहिती देत होता. त्या ग्रुपवरील मेसेज पाहून फिर्यादीचा विश्वास संपादन झाल्यानंतर, त्या ग्रुपची प्रमुख साक्षी गुप्ता हिने त्यांना ‘इनाम’ नावाचे एक बनावट अ‍ॅप डाऊनलोड करून घेण्यास सांगितले. फिर्यादीने ते अ‍ॅप डाऊनलोड करून घेतल्यानंतर त्यावर स्वतःची व बँकेची माहिती भरली.

त्यानंतर, संशयित आरोपींनी सांगितलेल्या विविध 17 बँक खात्यांवर फिर्यादीने 20 सप्टेंबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत वेळोवेळी एकूण 3 कोटी 3 लाख 15 हजार रूपयांची शेअर मार्केट व ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक केली.
पैसे गुंतवल्यानंतर, फिर्यादीला त्या अ‍ॅपवर तब्बल 22 कोटी 29 लाख 19 हजार 655 रूपयांचा फायदा झाल्याचे दिसू लागले. मात्र, 29 ऑक्टोबर 2025 रोजी जेव्हा त्यांनी ही फायद्यातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संशयित आरोपींनी त्यांना ‘इनाम सेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’च्या नावाने एक बनावट सर्व्हिस चार्ज नोटीफिकेशन पत्र पाठवले.

यात, पैसे काढण्यासाठी 15 टक्के सेवा शुल्क म्हणून 3 कोटी 34 लाख 37 हजार 948 रूपये अतिरिक्त भरण्याची मागणी करण्यात आली. आरोपींनी फायद्याच्या रकमेतून सर्व्हिस चार्ज न कापता, उलट नवीन पैशाची मागणी केल्याने फिर्यादीला संशय आला. त्यांनी विक्रम शहा याला संपर्क केला, मात्र त्यानेही मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. अखेर, आपली मोठी फसवणूक झाल्याची खात्री पटताच फिर्यादीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...