राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यात काल झालेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने परिसर झोडपून काढला. तर तांदुळवाडी, आरडगाव, मानोरी, वळण, देवळाली प्रवरा, लाख, जातप, करजगाव, टाकळीमिया आदी परिसरात काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील उत्तर भागातील लाख, जातप, करजगाव भागात वादळी वार्यासह गारपीट झाली.
शेती पिकांचे नुकसान, ऐन उन्हाळ्यात खळखळले पाणी
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्यातील अनेक गावात सोमवारी (दि. 5 ) अवकाळी पाऊस बरसला. तालुक्यातील वनकुटे आणि त्या पट्ट्यातील काही गावात गारपीट झाली असून यामुळे ऐन उन्हाळ्यात रस्त्यावरून खळखळून पाणी वाहिले. या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका आहे. अचानक झालेल्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकर्यांची धावपळ उडाली. सध्या कडक उन्हाच्या झळा बसत असतानाच सोमवारी दुपारी दोननंतर आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह वरुणराजा बरसला. वनकुटे, सुपा, ढवळपुरीसह पारनेर तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वनकुटे येथे मोठ्या प्रमाणात गारा पडल्या आहेत. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा चिंतेत आला असून त्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. एका रात्रीत शेतातील पीक आडवं झाले आहे. शेतकर्यांच्या आंबा, पपई यासह सर्व फळबागांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत लिंबू, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात कैर्यांचा सडा पडला.
अनेक ठिकाणी जोराच्या वादळ वार्यामुळेे शेतकर्यांच्या कांदा पिकावर टाकलेला कागद उडून गेला असून कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांची सध्या उन्हाळी कांदा भुसार्यात साठवण्याची लगबग सुरु आहे. औद्योगिक वसाहतीमुळे मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकर्यांना परप्रांतीय किंवा विदर्भ, मराठवाड्यातील मजूर जोडीने बोलावे लागतात. सध्या कांद्याला भाव नसताना आता आसमानी संकटाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे. सोमवारी पडलेल्या अवकाळी पावसाने उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे शेतमालांचे नुकसान झाले आहे.