राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये असून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण होते. ते भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी स्वीकारणार की स्वतंत्र भूमिका घेत अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, यावर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू होती. काही काळासाठी तनपुरे आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय तडजोडीच्या चर्चांनाही उधाण आले होते. त्यानुसार तनपुरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा आणि बदल्यात राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून युवानेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला चर्चेत होता.
मात्र, सध्याच्या घडामोडींवरून हा तडजोडीचा फॉर्म्युला मार्गी लागलेला नसल्याचे स्पष्ट होत असून तनपुरे यांनी स्वतंत्र भूमिका घेत मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्येही अपक्ष लढतीसाठी तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजपकडून युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहे. तनपुरे व कर्डिले यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सक्रिय संपर्क मोहीम सुरू केली असून विविध गावांमध्ये भेटीगाठी, कार्यकर्ता मेळावे आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा यावर भर दिला आहे.तनपुरे आणि कर्डिले या दोन्ही संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला गट तसेच विविध सामाजिक घटकांशी संवाद साधत आपापले समर्थन बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रलंबित मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी भूमिका मांडल्या जात आहेत.
दरम्यान, तनपुरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास ही लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. पारंपरिक पक्षीय समीकरणांपेक्षा व्यक्तिमत्त्वाधारित आणि स्थानिक पातळीवरील नातेसंबंधांचा या निवडणुकीवर मोठा प्रभाव पडू शकतो. तसेच मतविभाजनाचा परिणाम अंतिम निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, इतर राजकीय पक्षांची भूमिका काय राहणार, ते उमेदवार देणार की कोणाला पाठिंबा देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा निर्णय या निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो. एकूणच, राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ स्थानिक पातळीवरील निवडणूक न राहता प्रतिष्ठेची लढत बनत चालली आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज, अधिकृत घोषणा आणि प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राजकीय चित्र आणखी स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहे.




