राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाने जोरदार तयारी असून मतमोजणी (Votes Counting) राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पार पडणार आहे. सुरक्षा, मनुष्यबळ आणि तांत्रिक व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील (Rahuri Assembly Constituency) एकूण 3 लाख 33 हजार 545 मतदारांपैकी 1 लाख 87 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत सरासरी 56.20 टक्के मतदान झाले असून भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अथर्व म्हसे, वंचितचे संतोष चोळके यांच्यासह सात उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
मतमोजणीसाठी प्रशासनाने एकूण 20 टेबलांची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल, पोस्टल बॅलेटसाठी 2 टेबल तर अन्य प्रक्रियांसाठी 4 टेबल ठेवण्यात आले आहेत. मतदारसंघात एकूण 347 मतदान केंद्रे असल्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया 27 फेर्यांत पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलवर चार अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले असून एकूण सुमारे 80 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू होणार असून सुरुवातीला टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला प्रारंभ होईल. सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.




