राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
बहुचर्चित राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Rahuri Assembly By Election) आज गुरुवारी (23 एप्रिल) मतदानाच्या दिवशी अखेरच्या क्षणीही माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी त्यांच्याविषयीची संदिग्धता कायम ठेवली. अप्रत्यक्षपणे आपण निवडणुकीत तटस्थ आहोत, असेही स्पष्ट केले. दरम्यान, आज राहुरीच्या पोटनिवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत अवघे 30 टक्के मतदान (Voting) झाले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसला.
दुपारी 1 वाजेपर्यंत 3 लाख 33 हजार 545 मतदारांपैकी 98 हजार 740 मतदारांनी (29.60 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या सत्रानंतर पाच वाजेपर्यंत 50.74 टक्के मतदान झाले आहे. अनेक मतदान केंद्रांवर (Voting Center) मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. यात भाजपने शिवाजीराव कर्डीले (Shivajirao Kardile) यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे (Govind Mokate) यांच्यासह अन्य सहा उमेदवार आहेत. या निवडणुकीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आहे.





