अहिल्यानगर (प्रतिनिधी)
23 एप्रिल रोजी होत असलेल्या राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेसाठी पथके स्थापन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी 23 समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. सर्व 374 मतदान केद्रांचे वेब कास्टिंग (प्रत्यक्ष प्रेक्षपण) केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे तहसीलदार अमित पवार काम पाहणार आहेत.
नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे ठिकाण राहुरी तहसील कार्यालय परिसरातील जुने सेतू कार्यालय राहणार आहे. मतमोजणीचे ठिकाण लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, राहुरी येथे राहणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10 हजार रूपये तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 5 हजार रूपये राहणार आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा 40 लाख रूपये राहील. सर्व 374 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग तसेच 3 आदर्श मतदान केंद्रे, 1 पूर्णपणे महिला संचलित, 1 दिव्यांग आणि 1 युवा कर्मचार्यांव्दारे संचलित मतदान केंद्र अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रियेसाठी 598 बॅलेट युनिट, 614 कंट्रोल युनिट आणि 606 व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. मतदारसंघात 374 मतदान केंद्रे आहे. 15 मार्च 2026 च्या मतदार यादीनुसार 3 लाख 33 हजार 183 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 72 हजार 85 पुरूष, 1 लाख 61 हजार 97 महिला आणि 1 इतर मतदार आहे. तसेच 1 हजार 52 सैनिक मतदार आहेत. 28 मार्च 2026 पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना देखील मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जवळ असल्यास त्याबाबतचे कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. व्यापारी, व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी रोख रक्कम जवळ असल्यास या रक्कमेबाबतचे कागदपत्रे ठेवावीत.
टोल- फ्री क्रमांक कार्यान्वित
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालनासाठी 6 एफएसटी, 6 एसएसटी, 3 व्हीएसटी आणि 1 व्हीव्हीटी पथके 24 तास कार्यरत राहतील. विनापरवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्हे लिहिणे, कापडी बॅनर अथवा फलक, झेंडे लावणे व इतर कारणाने मालमत्ता विरूपित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांच्या सोईसाठी जिल्हा संपर्क केंद्रात 1950 हा टोल- फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी मोबाईलवरील सी-व्हिजील अॅपव्दारे करता येणार आहेत.
घरबसल्या मतदानाची सुविधा
85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक, तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी व करोना बाधित मतदारांसाठी घरबसल्या मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी टपाली मतपत्रिकेचीही सोय करण्यात आली आहे.





