अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि.23 एप्रिल) सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतदान केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी व पारदर्शक वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मतदारसंघातील 374 मतदार केंद्रावर वेबकास्टिंग (सीसीटीव्ही) प्रणाली लावली असून प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचारी व 1 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी व चार अपक्ष असे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारसंघात 374 मतदान केंद्रे असून 15 मार्चच्या मतदार यादीनुसार 3 लाख 33 हजार 183 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 72 हजार 85 पुरुष, 1 लाख 61 हजार 97 महिला आणि 1 इतर मतदार आहे. तसेच 1 हजार 52 सैनिक मतदार आहेत.
या मतदान प्रक्रियेसाठी एकूण 598 बॅलेट युनिट, 614 कंट्रोल युनिट आणि 606 व्हीव्हीपॅट यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रांची निवडणूक शाखेने तपासणी पूर्ण केली आहे. राहुरी मतदारसंघातील सर्व 374 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग (सीसीटीव्ही) करण्यात येणार आहे, तसेच 3 आदर्श मतदान केंद्रे, 1 पूर्णपणे महिला संचलित, 1 दिव्यांग आणि 1 युवा कर्मचार्यांद्वारे संचलित अशी व्यवस्था मतदान केंद्रावर आहे.मतमोजणी 4 मे रोजी लोकनेते रामदास पाटील धुमाळ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, राहुरी येथे होणार आहे.





