Tuesday, October 22, 2024
Homeनगरमतविभागणीच्या भीतीमुळे तनपुरे व कर्डिलेंची धाकधूक वाढली!

मतविभागणीच्या भीतीमुळे तनपुरे व कर्डिलेंची धाकधूक वाढली!

राहुरी | Rahuri

यंदा राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून बंडखोर व अपक्ष उमेद्वार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 2009 ते 2014 व 2014 ते 2019 या दोन पंचवार्षिक नगर तालुक्यातील शिवाजीराव कर्डिले यांनी दोन वेळा भाजपच्या उमेदवारीवर बाजी मारली. ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसादराव तनपुरे व डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यातील महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे राहुरी तालुक्यातील मतांची विभागणी. सन-2009 साली राहुरी विधानसभा मतदार संघात प्रसादराव तनपुरे, शिवाजीराव कर्डिले, शिवाजीराव गाडे व अ‍ॅड. सुभाष पाटील अशी चौरंगी लढत झाली होती.

- Advertisement -

यावेळी कर्डिले यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांना 57,380 मते मिळवून ते विजयी झाले. प्रसाद तनपुरे 49,047, शिवाजी गाडे 42,141 तर अ‍ॅड. सुभाष पाटील यांना 14,484 मते मिळाली. तनपुरे, गाडे व अ‍ॅड.पाटील या राहुरी तालुक्यातील उमेद्वारांमध्ये मतविभागणी झाल्याने सुमारे 8 हजार मतांच्या फरकाने कर्डिले वरचढ ठरले. तोच प्रकार 2014 साली राज्यात सर्वच पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. तनपुरेंनी धनुष्यबाण हाती घेऊन माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यावेळी नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होत कर्डिलेंनी जवळपास 26 हजार मतांनी निवडणूक जिंकली. या निवडणुकीत शिवाजी गाडे राष्ट्रवादीतून तर अमोल जाधव काँग्रेसमधून निवडणुकीला सामोरे गेले होते. या दोघांनी डॉ. उषाताई तनपुरेंना जवळपास 29 हजार मतांचा फटका दिला.

सन-2019 ला मात्र, विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव गाडे व इतर विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी पुर्वीपासून प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. ज्येष्ठ नेते शिवाजीराव गाडे यांनी प्राजक्त तनपुरेंना आमदार करणार असे स्वप्न असल्याचे बोलून दाखविले होते, मात्र त्यांचे लोकसभेच्या रणधुमाळी दरम्यान दुर्दैवी निधन झाले. सन- 2019 ला प्राजक्त तनपुरे यांनी सर्व पराभवाची परतफेड केली. विखे व कर्डिले गट एकत्रित असताना कर्डिले यांना मात दिली. तत्पूर्वी तीन महिने आधीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांना 72 हजार मतांची आघाडी मिळाली होती. ती मोडून काढत 24 हजारांच्या मताधिक्याने तनपुरे विधानसभेत पोहचले.

पुढे महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे ते तब्बल सहा खात्यांचे राज्यमंत्री होतेे. यातून मतदार संघाची बांधणी करताना बहुचर्चित व रेंगाळलेला तसेच अनेक निवडणुका ज्या निळवंडे धरणाच्या प्रश्नावर गाजर दाखवून लढविल्या गेल्या, तो प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री, त्यांचे मामा जयंत पाटील यांचा उपयोग करून घेत जवळपास त्या अडीच वर्षाच्या काळात 1250 कोटी रुपयांचा निधी आणून सर्व अडथळे पार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पुढे राज्यात सत्तांतर झाले. राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर बदललेल्या राजकीय स्थितीत माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले. यानंतर कर्डिले यांनी मतदार संघातील संपर्क वाढविला.

निळवंडेच्या पाटाचे उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कंबर कसली. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडेचे पाणी तालुक्यात दाखल झाले. आ. प्राजक्त तनपुरे व शिवाजीराव कर्डिले यांच्यातील निळवंडे श्रेयवाद मध्यंतरी चांगलाच रंगला. मात्र राहुरीचे जाणते मतदार येणार्‍या काळात हे पाणी नेमके कोणाच्या प्रयत्नातून आले, यावर शिक्कामोर्तब करतील. शिवाजीराव कर्डिलेंची भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाली असून देवळाली प्रवराचे कदम पिता-पुत्र उमेदवारी मिळविण्यासाठी अपयशी ठरले आहेत. ऐनवेळी ते काय निर्णय घेणार? बंडखोरी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आ. तनपुरे यांनी मतदार संघात वाढवलेली सबस्टेशन, रोहित्रांची संख्या, रस्त्यांची कामे, वांबोरी चारीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचलेले पाणी, नगरपरिषद हद्दीतील रस्ते, जॉगिंग ट्रॅक, जलतरण तलाव, एस.टी बसस्थानकाची इमारत, शेतकर्‍यांसाठी दिवसा वीज मिळण्यासाठी सौरउर्जा सबस्टेशनची निर्मिती व सर्वांना वेगवेगळ्या वैयक्तिक लाभार्थी योजना मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, मतदार संघातील त्यांनी वाढविलेला जनसंपर्क तसेच विधानसभेत राज्याचे व मतदार संघातील शेतकरी व सर्वसामान्य माणसाच्या गरजेचे मांडलेले अभ्यासपूर्ण मुद्दे या गोष्टी जमेच्या आहेत. याचबरोबर खा. निलेश लंके यांचाही एक मोठा चाहता वर्ग मतदारसंघात आहे. त्याचाही उपयोग आ. तनपुरेंना होईल, अशी शक्यता दिसत आहे.

शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी महायुती शासनाच्या कालवधीत आलेल्या लाडकी बहिण योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर, शेतकर्‍यांची वीजबील माफी, शेतकर्‍यांना मिळालेली नुकसान भरपाई तसेच मिळालेला पीक विम्याचा अनपेक्षित लाभ व निळवंडेचे तालुक्यात महायुतीच्या काळात आलेले पाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, त्याचबरोबर तालुक्यात विखे गटाचे असलेले भक्कम संघटन या जमेच्या बाजू दिसत आहेत. तसेच कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचा संच तयार केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते.

मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांचे खंदे समर्थक छत्रपती संभाजी प्रतिष्ठानचे राजू शेटे यांनीही कारखाना बचाव कृती समिती आंदोलन, दूध भावातील घसरणी बाबत, कांदा, सोयाबीन, कापूस व इतर शेती पिकांच्या ढासळलेल्या भावाबद्दल केलेली आंदोलने, युवक वर्गात त्यांच्याबद्दलची जवळीक व कोणतेही पद नसताना गरजवंतांच्या पाठीशी उभे राहण्याची तत्परता यातून मोठा जनसंपर्क वाढविला आहे. शिवसेना (उबाठा) उत्तर जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे यांचीही सेनेला महाविकास आघाडीतून राहुरीची जागा मिळावी, यासाठी गावोगावी बैठका घेऊन शक्तिप्रदर्शन सुरू आहे. परंतु, हे पेल्यातील वादळ असल्याची चर्चा आहे.

मध्यंतरी गावागावांतील अनेक युवा नेते व कार्यकर्त्यांचे भाजपातून राष्ट्रवादीत व राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेशाचे सोहळे झाले. परंतु, हा निवडणुकीत रंग आणण्याचा प्रकार असल्याने शह-कटशहाचे राजकारण यातून दिसते. ज्या विकास मंडळाने कर्डिले यांच्या पहिल्या निवडणुकांपासून त्यांची पाठराखण केली. त्या विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विखे व कर्डिले यांची साथ सोडून काँग्रेसचा पंजा पुन्हा हातात घेतल्याने महविकास आघाडीचे पाठबळ वाढणार आहे. परंतु चाचा तनपुरें बरोबर किती कार्यकर्ते विकास मंडळाचे म्हणून महाविकास आघाडीला मदत करतील? याबाबत शंका आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शह-कटशह देऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न दोन्हीकडून होत असताना वाढलेले मतदान, शासकीय योजनांचा भडीमार व शेतकर्‍यांचे घटत्या भावामुळे झालेले हाल आदी बाबी घेऊन मतदारांपर्यंत कोण पोहोचतो, यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या