राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकार्याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली.
बाबासाहेब किशोर राऊत (रा. बुरूडगावरोड, जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे. बाबासाहेब राऊत हे राहुरी नगरपरिषदेत महिला व बालविकास विभागात कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. तक्रारदाराला राहुरी तहसिल कार्यालयात ओळख असल्याचा प्रभाव दाखवून राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजनेअंतर्गत मंजूर होणार्या 30 हजार रुपयांच्या लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात राऊत यांनी 1 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने 20 मार्च 2026 रोजी पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 21 मार्च रोजी राहुरी येथे सापळा रचण्यात येऊन कारवाईदरम्यान सायंकाळच्या सुमारास बाबासाहेब राऊत यांनी तक्रारदाराकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ धाड टाकून त्यांना रंगेहाथ अटक केली.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षण आधिकारी पोलीस उपअधिक्षक अजीत त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वात पो.कॉ. गजानन गायकवाड, वैभव सुपेकर, सचिन सुद्रुक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांकडून करण्यात आले आहे.





