एक आरोपी जेरबंद; अन्य पसार
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – राहुरी शहरातील बसस्थानकासमोरील भरपेठेत असलेले एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात पाच चोरट्यांनी तेथून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एकाजणाच्या मल्हारवाडी शिवारात मुसक्या आवळल्या तर उर्वरित पसार झाले.
ही घटना रविवारी (दि.08) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. हे एटीएम अगदी भरपेठेत आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ अंधारात काहीतरी वाजत असल्याची चाहूल गस्तीवर असलेल्या पोलिसांना लागली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना पाहताच चोरटे पळून गेले. तर पोलिसांनी त्यांचा मल्हारवाडी शिवारात एक किमी पाठलाग करून त्यातील एकाजणाच्या मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेला आरोपी राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील असून दत्तात्रय बोर्हाडे असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.
दरम्यान, एटीएमजवळ पोलिसांना लोखंडी कटावणी, लोखंडी टामी, दोन मोठे स्क्रू, आढळून आले. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिरसाठ, यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोनि. देशमुख यांनी दिली.