राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असताना राहुरी शहरातील मोहिमेत मात्र, खरे अतिक्रमण न काढता केवळ जुजबी कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश राज्यात सर्वत्र पाळला. परंतु राहुरीत मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे.
तसेच जे अतिक्रमण काढले ते पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याने राहुरी नगरपरिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांच्या या भुमिकेकडे राहुरीकर संशयाने पाहत असून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा राहुरीसाठी नव्हता का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य राहुरीकरांमधून उपस्थित होत आहे.
राहुरी शहरातील शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल हा रस्ता 40 फुटांचा आहे. त्याचप्रमाणे शिवाजी चौक ते शनी चौक हा रस्ता 30 फुटांचा असताना सध्या हे दोन्ही रस्ते 20 फूटही भरायला तयार नाही. तसेच शुक्लेश्वर मंदिर ते कानिफनाथ चौक, दत्त मंदिराकडून क्रांती चौकाकडे जाणार्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे.
मात्र, प्रशासनाने मुख्य व्यापारी पेठेतच दुजाभाव केल्याने याबाबत सर्वसामान्यांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. तसेच शनिचौक ते स्टेशनरोडवरील 5 नंबर नाका या रस्त्यावरील काही अतिक्रमणे काढली परंतु काही अतिक्रमणे तशीच उभी आहे. नगर-मनमाड महामार्गावरही 50 फूट अतिक्रमणे हटविल्यानंतर पुन्हा टपरीवाले, वडेवाले आदींनी त्याच ठिकाणी चाकाच्या टपर्या तयार करून पुन्हा व्यवसाय थाटले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेले अतिक्रमण पुन्हा पूर्ववत झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तर न्यायालयाच्या निर्णयाला पूर्णपणे कानाडोळा केल्याचे दिसत असून राहुरी ते राहुरी स्टेशन या रस्त्यावरील अतिक्रमणे काढताना नरमाईची भूमिका घेऊन अतिक्रमणाला अभय दिल्याचे दिसते.
राहुरी शहरातील मल्हरावाडी रस्त्यापासून थेट मुलनमाथ्या पर्यंत जाणार्या पाटबंधारे विभागाची चारी पूर्ण अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. मल्हारवाडी रस्ता, पाण्याची टाकी परिसर व मुलनमाथा परिसरात या चारीवर झालेल्या अतिक्रमणामुळे या चारीवर असणार्या शेतकरी लाभार्थ्यांना पाटपाण्यापासून वंचीत राहावे लागत आहे. काही ठिकाणी या चारीत चक्क उकिरडे टाकल्याचे समजते. सार्वजिनीक बांधकाम विभाग, नगरपरिषद यांनी तरी काही अतिक्रमणे काढून दिखावा केला. परंतु पाटबंधारे विभागाने मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जणू आपल्यासाठी नसल्याचे भासवले. राहुरी शहरात अतिक्रमण काढताना नगरपरिषद प्रशासनाने नवीपेठेतील ग्रामिण रुग्णालया शेजारील जे अतिक्रमण काढायचेच होते ते काढून फक्त फार्स केला. परंतु, शनिचौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल पर्यंतचे अतिक्रमण काढण्यासाठी का टाळाटाळ केली या बाबत शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या भुमिकेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकार्यांची येत्या काही दिवसात बदली होणार असल्याने त्यांनी वाईटपणा नको म्हणून ही अतिक्रमणे काढली नसल्याचेही राहुरीकरांमधून बोलले जाते. तरी राहुरी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांनी नगरपरिषद हद्द तसेच नगर मनमाड रोड व शहरातील चारी येथील सर्व अतिक्रमणे येत्या आठ दिवसात शासन नियम व नगरपरिषदेने अदोगर जाहीर केलेल्या मोजमाप नुसार हटवून सर्वसामान्यांना योग्य तो दिलासा देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.