Monday, July 1, 2024
Homeनगरराहुरीतील खतविक्रेत्यांचा प्रताप, युरियासोबत इतर खते व उत्पादनं घेण्याची सक्ती

राहुरीतील खतविक्रेत्यांचा प्रताप, युरियासोबत इतर खते व उत्पादनं घेण्याची सक्ती

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

सध्या कपाशी व इतर पिकांना युरिया खताची आवशकता असल्यामुळे शेतकर्‍यांना युरिया खत हवे असेल, तर त्यासोबत अन्य खते किंवा उत्पादने विकत घ्यावी लागत आहेत. राहुरी तालुक्यातील खतविक्रेत्यांकडून ही सक्ती केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा मान्सून वेळेवर हजर झाल्याने राहुरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरीप पेरणी योग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची बि-बियाणे, खते घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रामध्ये झुंबड उडाली आहे. काही शेतकर्‍यांनी उपलब्ध असलेल्या सिंचनावर पावसा अगोदर कपाशीची लागवड केली आहे.

कपाशी व इतर पिकांना युरिया खताची गरज आहे. याचा गैरफायदा घेऊन विक्री होत नसलेली खते व इतर उत्पादने शेतकर्‍यांच्या माथी मारून ते खपविण्याचा खतविक्रेत्यांचा फंडा सध्या सुरू आहे. मागिल वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी आहे. शेतीसाठी लागणार्‍या खतांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. मात्र, युरिया खत सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या आवाक्यात आहे. ते घेण्यासाठी खतविक्रेत्यांकडून अन्य उत्पादनाची सक्ती केली जात असल्याचे काही शेतकर्‍यांनी सांगितले आहे. सध्या शेतकर्‍यांना कोणीही वाली उरला नाही. व्यापारी, औषधविक्रेते, बियाणेविक्रेते, विमा कंपन्याकडून फसवणूक होत आहे. काही विक्रेते बोगस बियाणे देऊन शेतकर्‍यांवर दुबार खर्चाची वेळ आणत असल्याने अतोनात नुकसान होत आहे.

राहुरी तालुक्यात खतविक्रेत्यांकडे युरिया खत मुबलक प्रमाणात आहे. मात्र, सर्वसामान्य शेतकरी एक-दोन युरिया गोणीची मागणी केली तर त्याला चक्क सर्व खताचे बिले झाले असल्याचे सांगितले जाते. किंवा त्याला इतर उत्पादने व नॅनो युरिया खरेदी करण्याची सक्ती केल्याने शेतकर्‍यांना नाहक भुर्दंड बसत आहे. ही शेतकर्‍यांची अडवणूक व लूट तात्काळ थांबावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकर्‍यांना युरिया किंवा इतर खते खरेदी खरेदी करताना कोणतेही इतर उत्पादने घेण्याची सक्ती अथवा बंधने नाही. असे प्रकार कोणी खतविक्रेता करीत असेल तर, त्याची तक्रार शेतकर्‍यांनी तालुका कृषी आधिकारी कार्यालयाकडे करावी, तात्काळ अशा खतविक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी आधिकारी राहुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या