Wednesday, May 13, 2026
HomeनगरRahuri : राहुरीत गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्रावर छापा

Rahuri : राहुरीत गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्रावर छापा

बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्र चालवणार्‍या तन्वीर हारुन देशमुख याच्याविरोधात बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली असून, बनावट पदवी प्रमाणपत्रांचा वापर करून रुग्णांवर उपचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत ग्रामिण रुग्णालय राहुरीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश बाबासाहेब मिसाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. मिसाळ हे सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. फिर्यादीनुसार, डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून राहुरीतील कथित बोगस डॉक्टर तन्वीर देशमुख याच्याविरोधात चौकशीचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामिण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्रावर भेट दिली होती.

या तपासणीदरम्यान तन्वीर देशमुख याने स्वतःकडे विविध वैद्यकीय पदवी व नोंदणी प्रमाणपत्रे असल्याचे दाखविले होते. त्यामध्ये ‘इंडियन मेडिकल बोर्ड – नॅचरोपॅथिक सिस्टम’ कानपूर, उत्तर प्रदेश या संस्थेची बीएएमएस (नॅट) पदवी, विविध नोंदणी प्रमाणपत्रे तसेच नॅचरोपॅथी व योग विषयातील डिप्लोमा प्रमाणपत्रांचा समावेश होता. मात्र, संबंधित प्रमाणपत्रांची विविध शासकीय व वैद्यकीय संस्थांकडून फेरतपासणी करण्यात आल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था, आयुष मंत्रालय भारत सरकार, आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच उत्तर प्रदेश येथील संबंधित वैद्यकीय बोर्डांनी संबंधित संस्था मान्यताप्राप्त नसल्याचे व तन्वीर देशमुख यांची नोंदणी नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच त्यांना नावापुढे डॉक्टर ही पदवी वापरण्याचा अधिकार नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.तपासणीदरम्यान क्लिनिकमध्ये इलेक्ट्रोपॅथी उपचार पद्धतीसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री, 44 बेड, विविध आयुर्वेदिक औषधे तसेच वापरलेल्या सुईंची अयोग्य विल्हेवाट आढळून आली. संबंधित व्यक्ती रुग्णांवर विविध उपचार पद्धतींचा वापर करून औषधोपचार करत असल्याचेही निष्पन्न झाले.

दरम्यान, दि. 12 मे 2026 रोजी डॉ. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा छापा टाकण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तसेच राहुरी येथील दिवाणी न्यायालयानेही नियमित दिवाणी दावा क्र. 365/2025 मध्ये महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा 1961 अंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी तन्वीर हारुन देशमुख याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 319(2), 318(4), 336(3), 340(2) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 34, 36 व 38 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दोन महिन्यांपूर्वीच विधानपरिषद मतदारांची माहिती निवडणूक आयोगाला सादर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यात पुन्हा एखादा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाआधी विधानपरिषदेच्या...