Wednesday, April 23, 2025
HomeनगरRahuri : भारतीय शेती आर्थिक लाभाची करण्यात कृषी विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका

Rahuri : भारतीय शेती आर्थिक लाभाची करण्यात कृषी विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असताना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे ज्ञान आणि तुमची जिद्द हीच तुमची प्रेरणा आहे. जिचा प्रकाश तुमच्या पुढील जीवन प्रवासात मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

- Advertisement -

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 38 व्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उद्देशून मार्गदर्शन करताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना.अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ.संजय कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डॉ.शरद गडाख, राज्यपालांचे ए.डी.सी. अभयसिन्हा देशमुख, डॉ. साताप्पा खरबडे, डॉ.प्रदीप इंगोले, दत्तात्रय उगले, गणेश शिंदे, संजीव भोर, डॉ.विठ्ठल शिर्के, डॉ.गोरक्ष ससाणे, डॉ. नितीन दानवले, डॉ.रविंद्र बनसोड, सदाशीव पाटील, हेमंत सोनार उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, तुम्ही केवळ पदवीधर नाही, तर भारतीय कृषी क्षेत्राचे भविष्य आहात. तुम्ही ज्ञान आणि कौशल्याने सज्ज आहात आणि समोरील संधी व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास सक्षम आहात. जे ज्ञान तुम्ही प्राप्त केले आहे, ते प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करा. सन 2047 विकसीत भारतामध्ये कृषीचा मोठा वाटा राहणार आहे. हवामान बदलांना तोंड देणार्‍या पिकांच्या जाती विकसित करून, सेंद्रिय शेती, समग्र अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाचा प्रसार करून कृषी विद्यापीठे हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यात आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करू शकतात. कृषिच्या विद्यार्थ्यांनी शेती फायदेशीर होण्यासाठी आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करावेत.

ना. माणिकराव कोकाटे म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्विकारावे लागेल. अधिक उत्पादनासाठी वारेमाप खते व किटकनाशकांच्या वापरामुळे समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी करून राज्य शासन विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कायमच कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. संजयकुमार म्हणाले, सन 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 1.7 अब्ज होईल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी आपल्याला अन्नधन्य उत्पादनात 70 टक्के वाढ करावी लागेल. प्रत्येक घराचे पोषण करणार्‍या शेतकर्‍यांना उन्नत करण्यासाठी आपला मनापासून प्रयत्न असला पाहिजे याची जाणीव ठेवा. पुन्हा एकदा विशेष हरितक्रांती घडवून आणली तरच आपण भविष्यात सर्वांना अन्न उपलब्ध करू शकू असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ.शरद गडाख म्हणाले, विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकर्‍यांना उपयोगी ठरणार्‍या 1866 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 311 वाणांची निर्मिती व 51 कृषी अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता या 8 पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकूण 2 कोटी 40 हजार 188 कोटी व निव्वळ 32 हजार 206 कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. विद्यापीठाने बदलत्या हवामानाला अनुरुप असे शेतकरीभिमुख संशोधन केलेले आहे.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 40 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 331 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4,830 विद्यार्थ्यांना पदवी असे एकूण 5 हजार 201 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीप्रदान सन 2023-24 मध्ये बी.एस्सी. (कृषि) पदवीत प्रथम आलेली प्रज्ञा खर्डे, बी.एस्सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली प्राची महांकाळ, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला दर्शन सूर्यवंशी यांनी सुवर्णपदक मिळविले. यावेळी पीएच.डी.च्या 8 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या 19 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या 9 विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पदव्युत्तर व कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले.

समारंभाला जिल्हाधिकारी पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष येरेकर, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ.तुकाराम मोरे, डॉ.के.पी.विश्वनाथा, डॉ. एम.सी. वाष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ.अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, माजी आ. चंद्रशेखर कदम, डॉ. हरी मोरे, तानाजी धसाळ, कृषिभूषण सुरसिंग पवार, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.आनंद चवई व डॉ.भगवान देशमुख यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sangamner : भंडारदरा-निळवंडेच्या आवर्तनामुळे शेतकर्‍यांना दिलासा

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner ऐन उन्हाळ्यात भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्‍यांसह नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण...