Sunday, September 27, 2026
Homeक्राईमRahuri : राहुरीत चार ठिकाणी मावा माफियांवर पोलिसांची कारवाई

Rahuri : राहुरीत चार ठिकाणी मावा माफियांवर पोलिसांची कारवाई

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरात अवैधरीत्या मावा व सुगंधी तंबाखू तयार करून विक्री करणार्‍या मावा माफियांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3 लाख 49 हजार 508 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे राहुरी शहरातील अवैध मावा व्यवसाय करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक चौधरी यांनी विशेष पथकासह राहुरी शहरातील विविध ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत अवैधरित्या मावा तयार करणार्‍या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

पहिली कारवाई संजिवनी वसाहत, राहुरी खुर्द येथे करण्यात आली. येथे गणेश मारुती दिवटे हा इसम घरामध्ये अवैधरीत्या मावा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकत सुपारी, सुगंधी तंबाखू व मावा तयार करण्याची मशीन असा 84 हजार 88 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडवरील इंगळे इस्टेट परिसरात करण्यात आली. येथे संदीप सुरेश तागड हा इसम अवैध मावा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 11 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तिसर्‍या कारवाईत स्टेशन रोड गावठाण परिसरात संदिप उर्फ पप्पू नामदेव शिरसाठ आणि अनिकेत भिमराज ठोंबे हे दोघे अवैध मावा निर्मिती करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून सुपारी, सुगंधी तंबाखू आणि मशीनसह 1 लाख 54 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 3 लाख 49 हजार 508 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा हादरा दिला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा. रजि. क्र. 584/2026, 585/2026 व 586/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, सफौ राकेश खेडकर, पोहेकॉ नरोटे, आजीनाथ पालवे, शैलेश रोहोकले, विशाल थोरात, ज्ञानेश्वर आघाव, दीपक फुंदे, हरदास आणि नवनाथ दहिफळे यांच्या पथकाने केली.

राहुरी शहरात व तालुक्यात अवैध गुटखा, मावा व सुगंधी तंबाखू विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असून युवकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या अशा व्यवसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच राहुरी खुर्द, राहुरी शहर, राहुरी फॅक्टरी येथील गुटख्याच्या होलसेल व्यापार्‍यांंवरही कारवाई होण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ३२ तास चालल्या विसर्जन मिरवणुका, डीजेचा दणदणाट कायम; विद्यानंद बापट,...

0
पुणे । Pune गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशांचा पारंपरिक गजर, आकर्षक देखावे आणि विद्युत रोषणाईसोबत यंदा एका वेगळ्याच चर्चेने पुणेकरांचे लक्ष वेधले. ध्वनिप्रदूषण आणि डीजेच्या मोठ्या...