राहुरी । तालुका प्रतिनिधी
राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान प्रक्रिया सुरु असून दुपारी 3 वाजेपर्यंत 45.90 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
काल सकाळी 7 वाजता गुलाबी थंडीत राहुरी विधानसभा मतदार संघातील राहुरी शहर, तालुका तसेच पाथर्डी, नगर तालुक्यातील गावांमध्ये मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदान धिम्या गतीने सुरू होते.
सकाळी 9 वाजेपर्यंत मतदार संघात 8 हजार 638 पुरूष तर 7 हजार 814 महिला अशा एकूण 16 हजार 452 मतदारांचे 5.01 टक्के मतदान झाले. त्यानंतर 9 वाजेनतंर मतदानाची गती कासवगतीने वाढू लागली.
सकाळी 11 वाजेपर्यंत 15.92 टक्के म्हणजे 51 हजार 605 इतके मतदान झाले. त्यामध्ये 31 हजार 612 पुरूष तर 19 हजार 993 महिलांचा समावेश होता. तर दुपारी 1 वाजे पर्यंत 30.92 टक्केवारीत 1 लाख 185 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 56 हजार 190 पुरूष तर 43 हजार 995 महिला मतदारांनी मतदानाचा हक्त बजावला.
दुपारी 3 वाजेपर्यंत राहुरी, नगर, पाथडी विधानसभा मतदार संघात 45.90 टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण 1 लाख 48 हजार 728 मतदारांनी मतदान केले. यात 78 हजार 318 पुरुष तर 70 हजार 419 मतदार होते.