Saturday, May 4, 2024
Homeनगरराहुरी, नेवासामधील गारपिटीचा अहवाल पाठवण्यास टाळाटाळ

राहुरी, नेवासामधील गारपिटीचा अहवाल पाठवण्यास टाळाटाळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

24 आणि 25 जानेवारीला जिल्ह्यातील काही भागात वादळासह गारांचा तडाखा बसला, तर दुसर्‍या दिवशी भिज पाऊस झाला होता. याचा फटका राहुरी आणि नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला होता. त्यावेळी कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यात राहुरी आणि नेवासा तालुक्यातील 1 हजार 421 हेक्टरवरील गहू, कांदा आणि मका पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार करून तो जिल्ह्याला पाठवण्यात आला. मात्र, त्यानंतर या प्राथमिक अहवालावर सामाधान मानत कृषी आणि महसूलच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करत नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे टाळले आहे.

- Advertisement -

दरम्यान, याबाबत राहुरीच्या तालुका कृषीच्या आणि महसूलच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधाला असता जिल्हास्तरावरून गारपीटीचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने पुढे कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे सांगितले. वास्तवात ज्या रात्री गारपीट झाली, त्याच्या दुसर्‍या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, राहुरीचे तहसीलदार यांना गारपिटीबाबत कल्पना देण्यात आली होती.

त्यांच्या आदेशानुसार कृषी आणि महसूलच्या पथकाने वांबोरी गावात शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत फोटोशेसन केले होते. मग आता स्वतंत्रपणे पंचनाम्यांच्या आदेशाची वाट कशासाठी पाहत आहे, असा सवाल शेतकर्‍यांकडून विचारण्यात येत आहे. विशेष म्हणजे महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात महसूल आणि कृषीच्या कर्मचार्‍यांकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची अशा प्रकारे हेळसांड सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जानेवारी महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाच्या एका पट्ट्यात, कात्रड, गुंजाळे या गावाच्या काही भागात वादळासह काही प्रमाणात गारपिट झाली होती. तर नेवासा तालुक्यातील चांदा गावासह अन्य ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाला होता. यात राहुरी तालुक्यात 581 हेक्टरवर कांदा, गहू, मका पिकांचे नुकसान झाले होते. झालेले नुकसान हे 33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. वांबोरी गावातील काही पट्ट्यात तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला आणि गव्हाची ओंबी भरलेला गहू भूईसपाट झाला होता.

ही बाब तातडीने पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह कृषी विभागाला कळण्यात आली होती. विभागीय कृषी अधिकारी विलास नलगे यांच्यासह कृषी विभागाच्या पथकाने वांबोरी गावातील नुकसान झालेल्या शेतांना भेट देऊन महसूलच्या यंत्रणेसह तातडीने कृषी सहायकांना प्राथमिक अहवाल नगरला सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. अशाच सूचना नेवासा तालुक्यातील कृषी यंत्रणेला देण्यात आल्या होत्या.

नेवासा तालुक्यातील चांदासह अन्य ठिकाणी 830 हेक्टरवर कांदा, गहू आणि मका पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला प्राप्त झालेला असून पुढे सविस्तर अहवालाबाबत नगरहून राहुरीच्या कृषी विभागाकडे विचारणा करण्यात येत असताना त्यांच्याकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत सविस्तर अहवाल न आल्यास ही बाब नवीन जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या