Saturday, May 18, 2024
Homeनगरआरक्षणानंतर काही इच्छुकांचा हिरमोड तर काहींना लागणार लॉटरी

आरक्षणानंतर काही इच्छुकांचा हिरमोड तर काहींना लागणार लॉटरी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुका पंचायत समितीच्या 12 गणांचे व जिल्हा परिषदेच्या सहा गटाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेत संधी मिळण्यासाठी आतूर झालेल्या काही इच्छुकांची स्वप्नपूर्ती तर काहींचे स्वप्नभंग होणार आहे. आरक्षणानंतर सत्तेचे राजकीय आडाखे व बेरजेच्या गणितात पूर्णतः बदल होणार आहे. काहींचे सत्तेचे गणित चुकणार असून तर काहींचे राजकीय समीकरणे जुळून येणार आहेत.

- Advertisement -

बारागाव नांदूरला गटासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाल्याने विद्यमान जि.प. सदस्य धनराज गाडे यांच्यासाठी या गटातून सत्तेचे दार बंद झाले आहे. तेथे आता नव्यानेच उमेद्वार शोधण्याची वेळ राजकीय पक्षांवर येणार आहे. टाकळीमिया गण हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथे सर्वसाधारण गटातील इच्छुकांची सत्तेची संधी हुकली आहे. तर टाकळीमिया गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने आता पंचायत समितीच्या गणासाठी इच्छुक महिलांचा मोर्चा गटाकडे वळणार असल्याची चर्चा होत आहे.

सात्रळ गण सर्वसाधारण व्यक्ती गटासाठी राखीव झाल्याने तेथे अनेक इच्छुकांनी आनंदोत्सव साजरा केला. सात्रळ गणात अनेक राजकीय रथी-महारथी असल्याने सात्रळ गणात तूल्यबळ लढत होणार आहे. सात्रळ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तेथे कुणबी कार्डासह माळी समाजाच्या अनेक इच्छुकांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत.

वांबोरी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथेही उमेद्वारीसाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे. वांबोरी गणातून विद्यमान पंचायत समिती सदस्य उदयसिंह पाटील यांची सत्तेची संधी हुकली आहे. मात्र, वांबोरी गटाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने तेथे विद्यमान जि.प. सदस्या शशिकलाताई पाटील यांना पुन्हा सत्तेत संधी मिळणार असल्याची चर्चा होत आहे.

नव्यानेच उदयास आलेला उंबरे गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथे अनेक इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. उंबरे जि.प. गट नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी राखीव झाल्याने तेथे नामदेवराव ढोकणे, साहेबराव म्हसे, यासह अनेक रथी महारथींना सत्तेचे वेध लागले आहेत. ब्राम्हणी गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने तेथे अनेक रथीमहारथींच्या कारभारणींसाठी आपआपल्या कारभार्‍यांनी राजकीय फिल्डींग लावली आहे.

गुहा गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने खुल्या गटातील इच्छुकांमध्ये तेथे जोरदार राजकीय रस्सीखेच होणार आहे. गुहा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी राखीव झाल्याने तेथे साई संस्थानचे विश्वस्त सुरेशराव वाबळे, अमोल भगनडे यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. कोल्हार खुर्द गण सर्वसाधारण व्यकीसाठी आरक्षित झाला आहे. तेथेही उमेद्वारीसाठी मोठी स्पर्धा राहणार आहे. राहुरी खुर्द गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथे विद्यमान सदस्याची मोठी राजकीय गोची झाली आहे.

मांजरी गण सर्वसाधारण व्यक्तीसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे तेथे खुल्या गटातील इच्छुकांबरोबरच अपक्षांचीही मोठी डोकेदुखी होणार आहे. मानोरी गण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेथे विद्यमान सदस्याची मोठी गोची होणार आहे. मात्र, उंबरे गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान पंचायत सदस्य रवींद्र आढाव हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा आहे. ताहाराबाद गण सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने तेथे उमेद्वारीसाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

सध्या पंचायत समिती गणांवर राष्ट्रवादीप्रणित माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गटाचा वरचष्मा आहे. तर जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी भाजपाप्रणित विखे गटाचा प्रभाव आहे. राज्यात आता सरकार बदलल्याने त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर झाला तर सत्तेची समिकरणेही बदलणार आहेत. राहुरी तालुक्यात सध्या काँग्रेस व शिवसेनेचे अस्तित्वच राहिलेले नाही. तर राष्ट्रवादी व भाजपाचा तालुक्यातील विविध सत्तेवर बोलबाला आहे. त्यामुळे आता विखे व तनपुरे यांनी या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. आरक्षणापूर्वी भाजपा व राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुक उमेद्वारांनी गण व गटनिहाय चमकोगिरी करून राजकीय साखरपेरणी करून ठेवली. मात्र, आता त्यांच्या आकांक्षांवर सर्वस्वी पाणी फेरणार आहे. त्यांचाही हिरमोड होऊन नव्याने अनेक चेहरे या निवडणुकीमध्ये बाजी मारणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या