राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील एका संवेदनशील व बहुचर्चित प्रकरणाला सोमवारी (दि. 23) नवे वळण मिळाले. राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच एका 43 वर्षीय व्यक्तीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील अच्युत गोपीनाथ साळे (वय 43) असे विष प्राशन केलेल्या इसमाचे नाव आहे, त्याने अचानक राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच विषप्राशन केले. तातडीने पोलिसांनी त्याला राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या व्यक्तीची सुसाईड नोट व्हायरल झाली असून, या व्हायरल झालेल्या नोटमधील मजकुरामुळे प्रकरण अधिकच गंभीर स्वरूप धारण करत आहे.
व्हायरल झालेल्या सुसाईड नोटमध्ये संबंधित व्यक्तीने नमूद केले आहे की, त्याच्या पत्नीने 5 एकर 20 आर जमीन खरेदी केली होती. सदर जमीन संयुक्त नावावर करण्याचे ठरले असतानाही, काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या सांगण्यावरून पत्नीच्या एकट्याच नावावर करण्यात आली. यामुळे घरगुती वाद अधिकच तीव्र झाले असून, पतीलाच घराबाहेर काढण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्याने केला आहे.
तसेच गेल्या दोन महिन्यांपासून मारहाण, घरावर दगडफेक व मानसिक छळ सुरू असल्याचेही त्याने सदर चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात विशेष म्हणजे, व्हायरल झालेल्या सुसाईड नोटमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय वलय असलेल्या प्रतिष्ठीत घराण्यातील सासरा-सुनेसह एका गावातील तंटामुक्ती अध्यक्ष तसेच आणखी आठ जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. जमीन व्यवहार सुमारे 20 लाख रुपये प्रती एकर दराने झाल्याचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला आहे. काही प्रतिष्ठित व्यक्तींनी त्याला घराबाहेर काढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही या नोटमध्ये केला आहे.
दरम्यान, संजय साळे यांनीही याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच अच्युतच्या खिशात सापडलेली चिठ्ठी पोलिसांकडे देणार असल्याचे स्पष्ट केले.
या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून, व्हायरल झालेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठीत व्यक्तींच्या नावांमुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. या प्रकरणाची माहिती घेतली असता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही चालू होती, परंतु गुन्हा दाखल झाल्याबाबत समजून आले नाही.





