राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
अज्ञात भामट्यांनी काल, 14 जुलै रोजी, पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर बाजारपेठेत सराफ व्यावसायिक राजेंद्र भन्साळी यांचे दुकान फोडून लाखों रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राहुरी शहरातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेंद्र सुरजमल भन्साळी यांचे राहुरी शहरातील जुनीपेठ येथील वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोने आणि चांदीचे दुकान आहे. राजेंद्र भन्साळी हे काल, 13 जुलै रोजी, रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. काल सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान भन्साळी यांचे दुकानाचे शटर थोडे उघडे दिसले. त्यानंतर दुकानात चोरट्यांनी उचकापाचक करून चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, एका पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी काल दि. 14 जुलै 2025 रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान प्रथम भन्साळी यांच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेर्यावर रंगाचा फवारा मारला. नंतर शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. भामट्यांनी दुकानात उचकापाचक करून ड्रॉवरमधील सुमारे 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने व सुमारे 25 किलो चांदीचे दागिने, मुर्त्या चोरून नेले. तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर घेऊन गेले.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, हवालदार मनोज गोसावी, गणेश भिगारदे, रमीजराजा आतार, राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहा. पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हवालदार विजय नवले, प्रमोद ढाकणे, संदीप ठाणगे आदींच्या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
त्यानंतर अहिल्यानगर येथील ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाने घटनास्थळी येऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सिमा नामक श्वान जागेवरच घुटमळले. त्यामुळे तपासकामात अडचणी निर्माण झाल्या. याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, डॉ.तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे, संचालक हर्ष तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख आणि शहरातील इतर व्यापारी व नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शहरातील प्रत्येक व्यापार्याने आपल्या दुकानासमोर आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावून ते क्लाऊड यंत्रणेसोबत संलग्न करावे, असे आवाहन केले.




