उंबरे | Umbare
राहुरी तालुक्यात सध्या सर्वच ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन योजनेतून सुरू असलेली कामे पूर्णपणे निकृष्ट दर्जाची व शासनाची दिशाभूल करणारी सुरू असून या सुरू असलेल्या कामातून एखाद्याही ग्रामपंचायतीस त्याचा कोणताच फायदा होणार नसून शासनाची 70 टक्के रक्कम तसेच ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून खर्च होणारी रक्कम ही पूर्णपणे पाण्यात जाणार आहे. या कामाची चौकशी करून शासनाची दिशाभूल करणारे सरपंच, ग्रामसेवक व संबंधित पदाधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यातील 83 ग्रामपंचायातींच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासाठी ही कामे सुरू आहेत. प्रत्येक गावातील लोकसंख्येवर आधारीत या योजनेसाठी निधी उपलब्ध झालेला असताना शासनाकडून 70 टक्के तर 30 टक्के हा निधी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून खर्च करणार आहे. जि.प. च्या पाणीपुरवठा विभागामार्फत वेगवेगळे अंदाजपत्रक करून या कामांसाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये स्मशान भूमी, पडित मोकळे जागेवरती घनकचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी चौकोनी आकाराच्या निकृष्ट दर्जाच्या खड्ड्यांमध्ये बांधकाम करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न सध्या ग्रामपंचायत व प्रशाकिय आधिकारी एकत्रित येऊन संगममताने करीत असल्याची चर्चा प्रत्येक गावात सुरू आहे.
शासनाने गावातील सार्वजनिक ठिकाणी असणारा कचरा एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्यात यावी, हा शासनाचा उपक्रम चांगला आहे. मात्र, ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी यांनी या उपक्रमाचा बोजवारा उडविला असून फक्त निधी लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. या खड्ड्यांचे बांधकाम करताना कोणत्याही अधिकार्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली नसून ठेकेदारांनी बांधकाम करून वेळोवेळी फक्त बिल काढण्यासाठी फोटो काढून संबंधित अधिकारी यांच्याकडे काम पूर्ण झाल्याचे सांगून बिले देण्याची मागणी केल्याचे समजते. सदर बांधकाम सुरू असताना हे बांधकाम कशासाठी? हा ग्रामस्थांना प्रश्न पडला. त्याबरोबर शोष खड्डे बांधण्यात आले. संबंधित अधिकार्यांनी या कामाचा दर्जा तपासल्याशिवाय या ठेकेदारांची बिले अदा करू नयेत, अन्यथा अनेक गावांतील ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत आहेत.
तालुक्यातील उंबरे ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी 46 लक्ष रुपयांचे काम पूर्ण झाले असल्याचे समजते. हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून बांधण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये कुठलाही घनकचरा न टाकता, त्यामध्ये 3 ते 4 फूट गवत उगवून वर आले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी दोन घंटागाड्या उपलब्ध असून या गाड्यांमध्ये कुठलाच कचरा गोळा केला जात नाही. शनिवारी बाजार झाल्यानंतर बाजारकरूंचा उरलेला भाजीपाला हा ग्रामपंचायतीऐवजी गावातील ग्रामस्थांना हा भाजीपाला उचलून टाकावा लागतो. उंबरे ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांची कामे झाली असून या कामाची चौकशी करण्यात यावी, तसेच ग्रामपंचायतीचे ऑडीट करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.