Tuesday, June 23, 2026
Homeनगरधक्कादायक ! जिवंत माणसाचा दफनविधी; राहुरी तालुक्यात खळबळ

धक्कादायक ! जिवंत माणसाचा दफनविधी; राहुरी तालुक्यात खळबळ

दफन केलेला मृतदेह नेमका कुणाचा?

हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgaon

राहुरी (Rahuri) तालुक्यातील सोनगाव येथे घडलेल्या एका अभूतपूर्व घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हरवलेल्या मतिमंद शब्बीर जमादार मन्सूरी याला मृत (Death) समजून त्याच्यावर धार्मिक परंपरेनुसार दफनविधी (Burial Ceremony) करण्यात आला. मात्र काही दिवसांनी तोच शब्बीर मन्सूरी जिवंत अवस्थेत सापडून सुखरूप घरी परतल्याने नातेवाईक, ग्रामस्थ आणि पोलिस यंत्रणाही अचंबित झाली आहे. या घटनेमुळे आता कब्रस्तानात दफन करण्यात आलेला मृतदेह नेमका कुणाचा होता, हा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण प्रकरण गूढ बनले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव (Songaon) येथील शब्बीर जमादार मन्सूरी हा मतिमंद असल्याने दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबीय व नातेवाईकांनी अनेक दिवस परिसरात त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. अखेर नातेवाईकांनी 24 मे 2026 रोजी राहुरी पोलीस स्टेशन (Rahuri Police Station) येथे मिसिंग कंप्लेंट रजिस्टर क्रमांक 108/2026 अन्वये हरवल्याची नोंद करण्यात आली. याच दरम्यान, जोर्वे परिसरात एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची नोंद संगमनेर पोलीस ठाण्यात (Sangamner Police Station) करण्यात आली होती. मृत व्यक्तीचे वर्णन आणि शब्बीरच्या शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये साम्य आढळल्याने त्याच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले. बुधवार 27 मे 2026 रोजी संबंधित नातेवाईक संगमनेर पोलीस स्टेशन येथे गेले. त्यांनी अज्ञात मृतदेहाची ओळख शब्बीर म्हणून पटवून दिली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार सोनगाव येथील कब्रस्तानात त्याच दिवशी रात्री त्या मृतदेहावर दफनविधी करण्यात आला.

मात्र काही दिवसांनी या संपूर्ण घटनेला अनपेक्षित आणि धक्कादायक वळण मिळाले. शब्बीर मन्सूरी हा प्रत्यक्षात चालत-चालत अहिल्यानगरच्या पुढील भागात पोहोचला होता. तेथे एका शेतकर्‍याने त्याची विचारपूस केली असता त्याने भूक लागल्याचे सांगितले. संबंधित शेतकर्‍याने त्याला जेवण दिले. त्याच्याशी संवादादरम्यान त्याने स्वतःचे नाव शब्बीर जमादार मन्सूरी असून आपण सोनगावचा (Songaon) रहिवासी असल्याची माहिती दिली. संबंधित शेतकर्‍याला संशय आल्याने त्या शेतकर्‍याने शब्बीरचे छायाचित्र काढून विविध व्हॉट्सअ‍ॅप समूहांवर प्रसारित केले. ही माहिती सोनगावपर्यंत पोहोचताच नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याची ओळख निश्चित केली. संबंधित घडलेल्या घडामोडीची माहिती संगमनेर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्याचे चुलत भाऊ व इतर नातेवाईक नगर येथे गेले आणि शब्बीरला ताब्यात घेतले .पुढे नगर (Ahilyanagar), राहुरी व संगमनेर पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला सुखरूप घरी आणण्यात आले.

शब्बीरच्या परतण्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले तरी आता एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या मृतदेहावर शब्बीर समजून दफनविधी करण्यात आला, तो मृतदेह नेमका कुणाचा होता? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांकडून संबंधित नोंदी, ओळख प्रक्रिया, शवविच्छेदन अहवाल आणि अन्य बाबींची सखोल पडताळणी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृत समजून दफन केलेला व्यक्ती काही दिवसांनी जिवंत परत आल्याची ही दुर्मीळ घटना सध्या सोनगाव, राहुरी आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. शब्बीरच्या सुखरूप परतण्याचा आनंद व्यक्त होत असतानाच कब्रस्तानात दफन करण्यात आलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख उलगडण्याचे मोठे आव्हान आता प्रशासन आणि पोलिस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.

ताज्या बातम्या

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाला नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार – वनमंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यात वन्याप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला कायमस्वरुपी नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल,...