Monday, May 27, 2024
Homeनगरराहुरी तहसिलमध्ये शिधापत्रिकांची अडीचशे प्रकरणे धुळखात पडून

राहुरी तहसिलमध्ये शिधापत्रिकांची अडीचशे प्रकरणे धुळखात पडून

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तहसिल मधील पुरवठा विभागात तालुक्यातील ई-सेवा केंद्रातून आलेले शिधापत्रिकेचे जवळपास 250 प्रकरणे धुळखात पडले असून पुरवठा विभाग खाजगी दलालांच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुरवठा विभागाबाबत संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी तालुक्यात जनतेच्या सेवेसाठी 18 सेतूकेंद्र कार्यरत असून या सेतू मार्फत विविध प्रकारचे दाखले व शिधापत्रिकेचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवले जाते. मात्र, राहुरीच्या तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात दाखल झालेले जवळपास शिधापत्रिकेचे 250 प्रकरणे प्रलंबीत असल्याचे समजते. त्यात शिधापत्रिकेत नाव सामाविष्ट करणे, नाव कमी करणे, दुबार शिधापत्रिका देणे व नविन शिधापत्रिका देणे या साठी नागरीकांनी प्रस्ताव दाखल केले आहे.

परंतु, शिधापत्रिकेसाठी नेमलेल्या आधिकार्‍याच्या हलगर्जीपणा व हट्टीपणामुळे ही प्रकरणे प्रलंबित आहेत. काही खाजगी दलालांना या विभागात सन्मानाची वागणूक देऊन त्यांचे प्रकरणे तात्काळ निकाली निघत असल्याचे बोलले जाते. यापुर्वी याच विभागात नविन शिधापत्रिका चोरीला गेल्याची घटनाही घडली होती. त्यातील काही आरोपींवर गुन्हे दाखल झाले असताना अद्यापही या विभागात खाजगी दलालांचा मोठा राबता आहे. तालुक्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यापुर्वी याबाबत दखल घेत थेट तहसिल कार्यालयात जाऊन आधिकार्‍यांची कानउघडणी केली होती.

मात्र, काही दिवस येथील कारभार सुरळीत चालला. त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. तहसिल कार्यालयात काही विभागात खाजगी माणसे संगणका समोर बसून जनतेला आपण सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून त्यांना वेठीस धरतात. तरी या गंभीर प्रकाराकडे तहसिलदार यांनी गांभिर्याने लक्ष घालून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या