Wednesday, November 20, 2024
Homeनगरविद्यापीठाला सध्या एकच कुलसचिव; प्रशासनाचा खुलासा

विद्यापीठाला सध्या एकच कुलसचिव; प्रशासनाचा खुलासा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

विद्यापीठाला सध्याला एकच कुलसचिव असून याबाबत कुणीही गैरसमज करुन घेऊ नये. असा खुलासा महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलसचिव या पदावरून प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यासंदर्भात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे यांनी सांगितले, 8 ऑक्टोबर रोजी शासनाच्या कृषी मंत्रालयाच्या स्तरावरून अरुण आनंदकर यांना कार्यमुक्त केले होते. या दिवशी ते कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यालय सोडून गेले होते. त्यामुळे कार्यालयाचा शिपाई कार्यमुक्त आदेश आणि पदभार हस्तांतरण दस्तावर घेऊन त्यांच्या घरी गेला असता, त्यांनी तो आदेश स्वीकारला नाही आणि पदभार हस्तांतर दस्तावर सही करण्यास नकार दिला.

- Advertisement -

शासनाच्या आदेशानुसार सदर आदेश स्वीकारणे त्यांनी गरजेचे होते. त्यांनी हा आदेश स्वहस्ते घेणे नाकारल्यामुळे त्यांना हा आदेश विद्यापीठाने ईमेल तसेच पोस्टाने आर.पी.ए.डी.द्वारे पाठविला. याचप्रकारे ते वारंवार कुलगुरुंच्या आदेशाचे उल्लंघन करुन त्यास केराची टोपली दाखवत असे. वास्तविक विद्यापीठाचे कुलगुरु हे नियुक्ती आणि अनुशासनात्मक अधिकारी असल्याने त्यांचे आदेश पाळणे हे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या अशा वरिष्ठ पदावरील अधिकार्‍याने असे वागणे अशोभनीय आहे. त्यांना दि. 8 ऑक्टोबर रोजी शासनाने कार्यमुक्त केले. विद्यापीठाने दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे यासाठी डॉ. मुकुंद शिंदे यांची कुलसचिवपदी नियुक्ती केली.

दि. 9 ऑक्टोबर, 2024 रोजी श्री. आनंदकर यांनी आदेशाचे पालन करुन मुळ आस्थापनेवर रुजू होणे आवश्यक होते. मात्र, ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपिठात (मॅट)े गेले. मॅटने दि. 11 ऑक्टोबर, रोजी ‘जैसे थे’ चा निकाल दिला. दि. 8 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत डॉ. मुकुंद शिंदे यांच्याकडे कुलसचिवपदाचा पदभार होता. विद्यापीठाने मॅटचा ‘जैसे थे’ आदेश पाळला. यानंतर श्री. आनंदकर यांनी दि. 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी खासगी अंगरक्षक घेवून कुलसचिव कार्यालयाचा अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला. अशा महसुलच्या वरिष्ठ अधिकार्‍याला मॅटचा आदेश समजू नये ही एक शोकांतिका आहे. शासनाने त्यांची नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्तपदी पदस्थापना केल्याचे कळते. विद्यापीठाला सध्याला एकच कुलसचिव असून याबाबत कुणीही गैरसमज करुन घेऊ नये असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या