राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरीचे कृषी विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत आहेत. त्यातच काल विद्यापीठात अशी घटना घटली की, ज्याप्रमाणे महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहे, त्याच प्रमाणे काल राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कारभार दोन कुलसचिवांनी चालविल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पदावर दोघांनीही दावा केल्याने विद्यापीठ प्रशासनाचा काल चांगलाच गोंधळ उडाला होता.
याबाबत समजलेली माहिती अशी, तत्कालीन प्रभारी कुलसचिव विठ्ठल शिर्के हे पदमुक्त झाल्यानंतर त्या जागेवर राज्य शासनाचे महसूलचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ.अरुण आनंदकर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर काही दिवसांनी राज्य शासनाने डॉ. आनंदकर यांना हटवून त्या जागी डॉ. मुकुंद शिंदे यांची नियुक्ती केली. या नियुक्तीला डॉ. आनंदकर यांनी मॅट कोर्टात आव्हान दिले होते. मॅट कोर्टात डॉ. आनंदकर यांनी भक्कम बाजू मांडली. त्यानंतर मॅट कोर्टाने ‘जैसे थे’ चे आदेश देऊन डॉ. आनंदकर यांची नियुक्ती कायम ठेवली. या नंतर हा आदेश घेऊन डॉ. आंनदकर विद्यापीठात गेले असता त्यांना काही सुरक्षाधिकारी एक शिष्टाचार म्हणून त्यांना त्यांच्या दालनापर्यंत सोडण्यास जात असताना डॉ. आनंदकर यांनी सुरक्षाधिकार्यांना थांबविले व ते एकटेच आपल्या दालनात गेले.
त्यानंतर सध्या कुलसचिव पदावर विराजमान असलेले डॉ. मुंकुद शिंदे यांनी तसा कोणताही आदेश आम्हाला प्राप्त नसल्याने त्यांना आपला पदभार संभाळण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचे समजते. त्यानंतर प्रशासनाने दोघांचीही दालनात बसण्याची सोय केल्याने राहुरी विद्यापीठाचा कारभार आता दोन कुलसचिव पाहणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. काही वेळानंतर डॉ. आनंदकर बाहेर गेले असता डॉ. शिंदे यांनी दालनाला कुलूप लावल्याने त्यानंतर हे दालन बंद होते अशी माहिती मिळते.
याबाबत डॉ. आनंदकर यांच्याशी सपंर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझी नियुक्ती कायदेशीर आहे. मी कायदेशिर पद्धतीने मॅट मध्ये बाजू मांडली. त्यामुळे मॅटने पुर्वीच्या परिस्थितीचे ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत.
राज्य शासनाने डॉ. आनंदकर यांना पदभारातून कार्यमुक्त केले आहे. त्यांच्या नियुक्तीचा मॅटकडून कोणताही आदेश आम्हाला प्राप्त झालेला नाही. तसेच मॅटला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकावे लागेल. त्यानंतरच काय तो निर्णय होईल. मॅट असा एकतर्फी निर्णय देऊ शकत नाही.
महात्मा फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमनध्वनी बंद होता.