Monday, November 18, 2024
Homeनगरझापुक झुपूक प्रचार शिगेला…निर्णायक क्षणी बाजी कोणाची?

झापुक झुपूक प्रचार शिगेला…निर्णायक क्षणी बाजी कोणाची?

सुनील भुजाडी |राहुरी|Rahuri

राज्यात विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात पार पडत आहेत. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसा निवडणुकीतही रंग भरू लागला आहे. महायुती, महाविकास आघाडी, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा सामना या मतदार संघात आहे. त्याचबरोबर इतर 10 उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महायुतीने गेल्यावेळी पराभूत झालेले भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना रणांगणात उतरविले तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पक्ष फुटीनंतर पक्षनिष्ठा जपत नेत्यावर श्रद्धा ठेवणारे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली आहे. तर साहेबराव म्हसे यांनी भाजपाला रामराम करून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून उमेद्वारी करून आपले नशिब आजमावित आहेत. दरम्यान, प्रचारात एकमेकांवर आरोपांची राळ उडविण्यात आली. सर्व आयुधांचा यथेच्छ वापर झाला. मतदारसंघातील यंदाचा एकमेकाला खिंडीत गाठणारा झापुक झुपूक प्रचार शिगेला असून मतदान काही तासांवर आले आहे. त्यामुळे अखेरच्या निर्णायक क्षणी कोण बाजी मारणार आणि विधानसभा गाठणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

- Advertisement -

कर्डिले व तनपुरे सामना तसा मतदार संघाच्या पुर्न:रचनेनंतर चौथ्यांदा रंगत आहे. माजी खा. प्रसाद तनपुरे व डॉ. उषाताई तनपुरे यांच्यावर कर्डिलेंनी मात केली. मात्र, तिसर्‍यावेळी 2019 विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी जवळपास 23 हजार मतांच्या फरकांनी कर्डिलेंना धक्का दिला. राज्यात तीन पक्षाची महाविकास आघाडी स्थापन होऊन सरकार बनविले. आ. प्राजक्त तनपुरे यांना तब्बल सहा खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. या मंत्रीपदाचा उपयोग करीत अडीच वर्षात प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीची संघटना बांधणीबरोबरच मोठी विकास कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावला. परंतू, अडीच वर्षात या विकासाला शिंदेंच्या गुवाहटी, सुरत, मुंबई दौर्‍यातून लगाम बसला व राहुरीचे मंंत्रीपद गेले. त्यानंतर राष्ट्रवादीतही फुट पडून अजित पवारही सत्तेत सामील झाले. त्यातून फक्त 12 आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात शिल्लक राहिले. त्यात आ. प्राजक्त तनपुरे होतेच.

महायुती शासन सत्तेत येण्याआधीच आपल्या चाणाक्ष डावपेचातून जिल्ह्याच्या सहकारावर पकड असलेल्या जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद शिवाजी कर्डिलेंना मिळाले व महायुतीची सत्ता स्थापनेनंतर कर्डिले पुन्हा सक्रीय झाले. पालकमंत्री विखेंच्या नेतृत्वात कर्डिलेंनी पुन्हा मतदारसंघात संपर्क वाढवून गावागावात पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटने, विखे व कर्डिलेंच्या उपस्थित होऊ लागली. बहुचर्चित असलेल्या निळवंडे धरणाचे पाणी तर पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आले व हे पाणी आमच्याच सरकारने कसे राहुरीपर्यंत आणले, याबाबत ‘कलगीतुरा’ तालुक्याला पाहायला मिळाला.

आ. तनपुरे यांनी अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात कोरोना असूनही तब्बल 1250 कोटी रुपयांचा निधी निळवंडेच्या कामासाठी स्वत: प्रयत्न करून आणला व त्याचेच हे फलित आहे. संगमनेर तालुक्यातून येणारा बोगदा फोडण्यात आपण कसेे प्राधान्य देऊन ठेकेदारांकडून मुदतीत काम करवून घेतले व त्यानंतरच निळवंडेचे पाणी राहुरीच्या हद्दीत आले. याचा तनपुरेंकडून वारंवार उल्लेख सुरू झाल्यानंतर महायुती शासनानेच आपल्या 10 वर्षाच्या कार्यकाळातील पाठपुराव्याचे हे यश असल्याचा दावा कर्डिले व विखे गटाकडून केला गेला. राहुरी शहरातील बसस्थानक, तीन भव्य वेशी, जॉगिंग टॅ्रक, पुरक पाणी योजना, भुमिगत गटार योजना, जलतरण तलाव यासह अनेक कामे मार्गी लावण्यात यशस्वी ठरल्याने आ. तनपुरेंना ही जमेची बाजू मतदार संघात मताधिक्य मिळवून देण्यास उपयुक्त ठरत आहेत.

शिवाजी कर्डिले महायुती शासनाने आणलेली लाडकी बहिण योजना, पीक विम्याचे शेतकर्‍यांना मिळालेले पैसे, आपत्तीकाळात शेतकर्‍यांना केलेली मदत, त्याचबरोबर दुधाला दिलेले सात रुपये अनुदान तसेच शहर पुरक पाणी योजना व भूमिगत गटार योजना आपण स्वत: कशी मंजूर करून आणली व श्रेय तनपुरे घेत आहेत. बर्‍याच कामांचे प्रस्ताव, पाठपुरावा, आपल्याच काळातील असल्याचा उल्लेख ते आपल्या भाषणातून करताना महायुती शासन कसे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले, हे सांगताना दिसत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे साहेबराव म्हसे यांनीही प्रस्थापितांना शह देण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. मतदार संघात प्रचार दौर्‍या दरम्यान घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधून आपले व्हिजन ते मांडत आहेत. राहुरी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी या निवडणुकीत रान उठवून विरोधकांवर ते तुटून पडले आहे. राहुरी कारखाना, नगर-मनमाड महामार्ग, तालुक्यातील बंद पडलेल्या संस्था या मुद्यावर ते प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.

कर्डिलेंच्या प्रचाराची धुरा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, सौ.अलकाताई कर्डिले व स्वत: उमेद्वार घरोघरी भेटी देऊन आपली भूमिका स्पष्ट करीत असताना आ.तनपुरे यांच्या मातोश्री डॉ. उषाताई तनपुरे, पत्नी सोनालीताई तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, युवानेते हर्ष तनपुरे आदींसह सर्वच तनपुरे घराणे प्रचारात दिसत आहेत. निवडणुकीत दहशतीचा मुद्दा गाजत असताना अक्षय कर्डिले यांनी राहुरीच्या शनि मंदिरासमोर जे दंड थोपटले त्यानंतर कर्डिले यांच्या पुतणी डॉ. शुभांगी शेडाळे तसेच बुर्‍हानगर येथील अ‍ॅड. अभिषेक भगत यांच्याबाबत गुंडशाही केलेल्या मुलाखती प्रचारात रंग आणत आहेत. तसेच माजी खा. प्रसादराव तनपुरे यांची ऑडिओ क्लिप वापरून तनपुरे कसे दडपशाही करतात, हे सांगण्याचा प्रयत्न कर्डिले यांच्याकडून होत आहे.

एकूणच निवडणूक रंगतदार स्थितीत आलेली असून प्रचाराची सर्वच पातळीवर धामधूम दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या खिशात खणखण जोरात आहे. मतदारांनाही लक्ष्मी दर्शनाची सोय दोन्ही मोठ्या प्रमाणात होईल, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहेत. राहुरी विधानसभा मतदार संघ हा पुनर्रचनेत राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यात विखुरला आहे. या मतदार संघातील 3 लाख 21 हजार 88 मतदार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी कोणाच्या बाजूने कौल देणार हे 23 नोव्हेंबर रोजीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या