Sunday, May 19, 2024
Homeनगररेल्वेप्रश्नी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार - खा. लोखंडे

रेल्वेप्रश्नी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार – खा. लोखंडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कोणत्याही परिस्थितीमध्ये शहरातील नागरिकांना विस्थापित होऊ देणार नाही. याप्रश्नी लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या दालनात रेल्वे अधिकारी यांच्यासह इतर अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन यातून सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही खा. सदाशिव लोखंडे यांनी दिली.

- Advertisement -

रेल्वेच्या जागेसंदर्भात असणार्‍या कागदपत्रांच्या रेकॉर्डच्या आधारानेच रेल्वेने संबंधितांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. ज्या दुकानदार, घरावाल्यांकडे याबाबत काही कागदपत्रे असतील तर त्यांनी रेल्वेकडे सादर करावीत, रेल्वेने दिलेल्या नोटिशीला तातडीने उत्तर देणे आवश्यक आहे, असे आवाहन रेल्वेच्या अधिकार्‍यांनी केले. त्याचबरोबर रेल्वेचा नकाशा आणि फायनल डेव्हलपमेंट प्लॅनच्या नकाशामध्ये तफावत दिसत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

शहरातील घर बचाव कृती समितीने काल सकाळी नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वेचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पालिकेचे अधिकारी यांच्यासह समितीचे पदाधिकारी तसेच घर मालक, दुकानमालक यांची बैठक बोलावली होती. यावेळी घर बचाव कृती समितीचे मुख्तार शहा, सिद्धार्थ मुरकुटे, नगरसेवक अंजुम शेख, प्रकाश चित्ते, नागेश सावंत, अशोक बागुल, राजेश अलघ, तिलक डुंगरवाल, तौफीक शेख, समाजवादी पक्षाचे जोएफ जमादार, आशिष बोरावके, कलीम कुरेशी, रज्जाक पठाण, रियाज खान पठाण, रहमान अली शहा, आयूब कुरेशी, जाफर शहा, दीपक चव्हाण, मेहबूब प्यारे, मुबारक शेख, विकास डेंगळे, युवराज घोरपडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी दीपककुमार खोतकर आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे, टाऊन प्लॅनिंगचे अधिकारी उपस्थित होते.

खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, शहरातील नागरिकांना रेल्वे प्रशासनाने अचानकपणे नोटिसा पाठवून त्यांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे मंत्री आणि वरिष्ठांशी आपले चांगले संबंध असल्याने खासदार या नात्याने येथील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. याबाबत सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन केंद्राकडे त्याचा प्रस्ताव स्वतः घेऊन जाणार असल्याचे आश्वासन खा. लोखंडे यांनी दिले. तसेच शिर्डीचा खासदार म्हणून केंद्रामध्ये एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रश्न सुटण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या दालनात नगर विकास, महसूल, वनविभाग, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन यातून सकारात्मक निर्णय घेऊन कोणत्याही परिस्थितीत येथील लोकांना विस्थापित होऊ देणार नाही, असा विश्वास खा.लोखंडे यांनी दिला. यावेळी स्थनिक रहिवाशांसह प्रकाश चित्ते, अंजुमभाई शेख, तिलक डुंगरवाल, सिद्धार्थ मुरकुटे, मुख्तार शाह, अशोक बागुल, राजेश अलघ, नागेश सावंत आदींनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

मालधक्का रेल्वे उड्डाणपुलाजवळ नेण्यात यावा – डुंगरवाल

सध्याचा मालधक्का हा नेवासा रोडवरील रेल्वे उड्डान पुलाजवळ नेण्यात यावा, त्याठिकाणी मोकळी जागा आहे. परंतु याठिकाणी मालधक्का झाल्याने अनेक दुकानदार तसेच रहिवाशी बेघर होतील, त्यामुळे मालधक्का हा रेल्वे उड्डान पुलाजवळ नेण्यात यावा, अशी मागणी तिलक डुंगरवाल यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी खा.सदाशिव लोखंडे यांच्याकडे बैठक संपल्यानंतर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या