Saturday, July 27, 2024
Homeनगररेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासातून कोपरगावच्या अर्थकारणाला चालना मिळणार - आ. काळे

रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासातून कोपरगावच्या अर्थकारणाला चालना मिळणार – आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

रेल्वे प्रवाशांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्याबाबत रेल्वे विभागाकडे आजवर केलेल्या पाठपुराव्यातून बहुतांश समस्या सोडविल्या आहेत. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 29 कोटी 94 लक्ष निधीतून कोपरगाव रेल्वे स्थानकाच्या होणार्‍या पुनर्विकासातून कोपरगाव मतदार संघाच्या अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कोपरगाव रेल्वे स्थानकाला पुनर्विकासासाठी देण्यात आलेल्या 29 कोटी 94 लक्ष निधीतून करण्यात येणार्‍या कामाचे भुमिपूजन रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. व्यासपीठावर भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे, खा. सदाशिव लोखंडे, मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, रवींद्र पाठक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, बाबासाहेब पवार, महिला आघाडीप्रमुख विमल पुंडे, कोपरगाव रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक बी. एस. प्रसाद आदी उपस्थित होते.

आ.आशुतोष काळे म्हणाले, रेल्वे स्टेशनच्या समस्याबाबत केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव रेल्वे स्टेशनवरील लिफ्टचे काम प्रगतिपथावर आहे. एक्स्ट्रा ट्रॅकसाठी तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या निर्मिती ची केलेली मागणी पूर्ण झाली आहे. अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून स्वच्छतेचा प्रश्न देखील सुटला आहे. नवीन डोम बांधण्यात आले आहेत,गुड्स लाईन वाढवण्यात आली आदी मागण्या पूर्ण झाल्या असून अनेक सोयी सुविधा रेल्वे प्रवाशांना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर मिळत आहेत त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये निश्चितपणे समाधानाचे वातावरण आहे. तसेच अमृत भारत स्थानक योजनेत नवीन पादचारी पुलाची मागणी केली होती ती मागणी मान्य करण्यात आली असून नवीन पादचारी पूल करण्यात येणार आहे.

कोपरगाव रोटेगाव रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगावला दक्षिण भारत जोडला जाणार आहे. मतदार संघाचा अधिकचा विकास साधण्यासाठी कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करून या कामाला गती देणे गरजेचे आहे. कोपरगाव रोटेगाव रेल्वे मार्गामुळे संपूर्ण दक्षिण भारत कोपरगावला जोडला जावून कोपरगाव मतदार संघाचा अधिकचा विकास होणार आहे. याची दखल घेऊन या कामाला गती द्यावी. राज्य व परराज्यातून शिर्डी येथे येणारे लाखो भाविक कोपरगाव रेल्वे स्टेशवरुन मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असल्यामुळे कोपरगाव रेल्वे स्टेशनचा विकास होणे अत्यंत गरजेचे होते. रेल्वे स्टेशनचा विकास झाल्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध उपलब्ध होऊन शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन अमृत भारत स्थानक योजनेत कोपरगाव रेल्वे स्टेशनचा समावेश केल्याबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकारचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कोपरगाव रेल्वस्थानकाच्या पुनर्विकासासाठी 29 कोटी 94 लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल भाजपा नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व दर्शना जरदोश यांचे मतदारसंघातील सर्व जनतेच्यावतीने आभार मानले.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पुनर्विकासामुळे रेल्वेस्थानकाचा कायापालट होऊन प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोपरगाव रेल्वेस्थानक शिर्डी येथील जागतिक ख्यातीच्या साईबाबा देवस्थानला भेट देण्यासाठी येणार्‍या देश-विदेशातील साईभक्तांच्यादृष्टीने केंद्रस्थानी आहे. कोपरगाव रेल्वेस्थानकावर साईभक्त व प्रवाशांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून अनेक छोटी-मोठी कामे मार्गी लागली आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 29.94 कोटी रुपये निधीतून कोपरगाव रेल्वेस्थानकाचा विकास व सुशोभिकरण होणार आहे. यामुळे निश्चितच रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे. अशा विविध विकासकामांमुळे कोपरगाव रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार असून, या परिसराच्या वैभवात भर पडणार असल्याचे सौ.कोल्हे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या