Saturday, November 2, 2024
Homeनगररेल्वेच्या भुयारी मार्गातील पाण्याच्या निचर्‍याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

रेल्वेच्या भुयारी मार्गातील पाण्याच्या निचर्‍याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले असून या भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात व इतर अनेक ठिकाणी प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने या पाण्याच्या निचर्‍याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

सौ. कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे, भारतीय रेल्वेने बहुतांश ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग सुरू केले आहेत. मात्र, चुकीच्या डिझाईन व बांधकामामुळे अनेक ठिकाणी या भुयारी मार्गावर पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना ये-जा करणे अवघड बनले आहे. मनमाड-दौंड हा लोहमार्ग कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून गेलेला आहे. दररोज अनेक रेल्वेगाड्यांची रेलचेल असलेल्या या रेल्वेमार्गावर कोपरगाव तालुक्यात भोजडे चौकी, संवत्सर, आंचलगाव, बोलकी आदी ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आलेले आहेत.

ज्याठिकाणी रेल्वे मार्गावर भुयारी मार्गाचे बांधकाम केले आहे, त्याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या साचलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने हे भुयारी मार्ग नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या भुयारी मार्गात पाणी साचल्याने शेतकरी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, दुचाकी, चारचाकी वाहनचालक, कामगार व नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. बहुतांश ठिकाणचे भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निचरा होत नाही. हे पाणी भुयारी मार्गाच्या मधोमध साचत आहे. परिणामी, नागरिकांना व वाहनचालकांना या भुयारी मार्गातून जाणे अवघड झाले आहे. बहुतांश भुयारी मार्ग पाणी साचल्याने बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सतत पाणी साचत असल्यामुळे दळवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहने मध्येच बंद पडतात व वाहनांचे मोठे नुकसान होते. पाणी साचल्याने भुयारी मार्गावर असलेले रेल्वे रूळ जीव मुठीत धरून ओलांडण्याशिवाय पादचार्‍यांपुढे पर्याय नसतो. त्यामुळे रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यातून अनेकदा अपघातही घडतात. रेल्वे विभागाने मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात साचणार्‍या पाण्याच्या निचर्‍याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तातडीने या प्रश्नात व्यक्तिश: लक्ष घालून याबाबत उपाययोजना करण्यासाठी संबंधित रेल्वे अधिकार्‍यांना आदेश द्यावेत, अशी विनंतीही स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या