Sunday, November 10, 2024
Homeनगरसततच्या पावसामुळे नगर दक्षिणेत पिकांचे नुकसान

सततच्या पावसामुळे नगर दक्षिणेत पिकांचे नुकसान

पाथर्डी-शेवगाव तालुक्यात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून मुसळधार || शेतकरी पुन्हा हवालदिल

अहमदनगर/पाथर्डी/ शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar | Pathardi

गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या काही भागात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीस आलेल्या तर काही ठिकाणी फुलोरा अथवा शेंगा अवस्थेत असणार्‍या पिकांना त्याचा फटका बसताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत विशेष करून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कपाशी पिकाचे या पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. तालुक्यातील पाचही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कृषी विभागाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणी होत आहे. गत दोन दिवसांत पाथर्डी तालुक्यातील 69.6 मी. मी, टाकळीमानूर 81 मी.मी. माणिकदौंडी 66 मी. मी.करंजी 82 मी. मी., मीरी 65 मी. मी. पाऊस झाला आहे. यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. तालुक्यातील जवळजवळ सर्वच नद्या, ओढे, नाले तुडूंब भरले असून अनेक ठिकाणी पूर आलेला दिसत आहे.

या पावसामुळे शेतकर्‍यांचा उडीद, मूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेवगाव तालुक्यात देखील दोन दिवसांपासून पाऊस बरसत आहे. तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांत पडणार्‍या पावसाची आकडेवारी मोठी आहे. चापडगाव मंडळात एकाच दिवशी 100 मि.मी. पावसाची नाेंंद झालेली असून याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पिकांवर होताना दिसत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येणार आहे. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती वाईट होती. यंदा ती जादाच्या पावसामुळे वाईट होताना दिसत आहे.

कृषी विभाग साखर झोपेत
जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. विशेष करून शेवगाव, पाथर्डी, नगर आणि पारनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, कपाशी पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र, शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यातील कृषी विभागाने अद्याप शेतकर्‍यांच्या नुकसानीची माहिती संकलित करण्यास सुरूवात केली नसल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करत कृषी आणि महसूल विभागाला सूचना दिल्यानंतर देखील कृषी विभागासह संबंधित विभाग साखर झोपेत असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या