अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगरसह राज्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार चारा पिकांची लागवड करण्याचे आदेश राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत. त्या अनुषंगाने नियोजन करण्यास राज्याचे पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात वैरण विकास योजनेतंर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून नियोजन करण्यात आले असून यातून चारा पिकांच्या उत्पादनाचे नियोजन करण्यात येणार आहे. वैरण विकास योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून तरतूद करण्यात आलेली आहे.
यंदा पाऊस लांबल्याने शेतकर्यांसह सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मान्सून राज्यात दाखल होऊन काही दिवसांचा कालावधी लोटला असून अद्याप पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. लवकर पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या चार्या गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे यंदा अल-निनो प्रभावामुळे पावसाचे सरासरी प्रमाण घटण्याची शक्यता आहे. यासाठी आतापासून नियोजन करण्यात येत असून पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्ध करण्यासाठी चारा पिकांच्या लागवडीवर व वैरण उत्पादनावर भर देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांनी काही निर्देश दिले असून यात पुढील वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा वार्षिक योजनेतील आर्थिक तरतूद तातडीने वितरीत करावी, आवश्यकतेनुसार वैरण बियाणांची तरतूद वाढवावी. प्रत्येक जिल्ह्यात वन विभाग, वन विकास महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ, शेती महामंडळ आदी संस्थांकडे उपलब्ध होणारा चारा राखून ठेवावा. जिल्हानिहाय कृषी विभागाकडील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रे, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापिठाच्या अधिनस्त असलेले क्षेत्रे येथील उपलब्ध जमिनीमध्ये चारा पिकांची लागवड करून अधिक चारा उत्पादन घ्यावे, जिल्हा परिषदेच्या ‘स्व’ निधीतून वैरण बियाणे वितरण, मुरघास बॅग खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याच्या सूचना यांचा समावेश आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असून त्यांना चार्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आणि पशुसंवर्धन विभागावर आहे. यासाठी वैरण विकास योजना राबवण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे यंदा जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी तरतूद करण्यात आलेली. यासाठी जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. तर नियोजन समितीने वैरण विकास योजनेसाठी एका कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासह टीएसपी (आदिवासी भागात) स्वतंत्रपणे 15 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
योजनेत लाभार्थी शेतकर्यांना मका, संकरित ज्वारी यासह चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे. याव्दारे चारा पिकांची लागवड करून त्याव्दारे चारा पिकांचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वैरण विकास योजनेतून 6 हजार 666 शेतकर्यांची लाभार्थी निवड करून त्यांना चारा पिकांचे बियाणे देण्याचे नियोजन आहे. मात्र, यंदाची परिस्थिती पाहता वैरण विकास योजनेचा निधी वाढण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा पावसाअभावी मूग, उदिडाचे क्षेत्र घटण्याची शक्यता
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामाची स्थिती बिकट होण्याची चिन्हे दिसत आहे. मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्याने कडधान्य पिकांच्या पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम मूग आणि उदिडावर होणार असून या पिकांचे क्षेत्र घटून त्याऐवजी खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर आणि चारा पिकांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाला आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामचे सरासरी क्षेत्र 4 लाख 60 हजार हेक्टर आहे. दरवर्षी पडणारा पाऊस आणि हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजाआधारे कृषी विभाग खरीप हंगामाच्या पेरण्या प्रस्तावित नियोजन आखते. यानुसार यंदा 6 लाख 39 हजार हेक्टवर खरिपाच्या पेरण्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र, पावसाच्या बदलेल्या चित्राने खरीप हंगामासोबत कृषी विभागाचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात विशेष करून दक्षिण भागात नगर, पारनेर, कर्जत, जामखेड आणि उत्तर नगर जिल्ह्यातील पठार भागावर कडधान्य पिकांच्या पेरण्या होतात.
त्यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, मटकी या कडधान्य पिकांचा समावेश असून जिल्ह्याच्या उर्वरित भागात बाजरी, सोयाबीन, कापूस, चारा पिकांसह ऊस लागवड करण्यात येते. यंदा जिल्ह्यात काही भागात रोहिणी नक्षत्रात तुरळक पावसाचा शिडकाव झाला. त्यानंतर आलेले मृग नक्षत्र जवळपास कोरडेच आहे. यामुळे शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले असून कृषी विभाग देखील बुचकाळ्यात आहे.
यंदा जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ झाली असून मे आणि जून महिन्यांत माणसांसोबत जनावरांच्या अंगाची लाहीही होतांना दिसली. पाऊस लांबल्याने उन्हाच्या झळा वाढत असून सर्वांना वरूण राजाची प्रतिक्षा आहे. हवामान खात्याकडून कधी पावसाचा तर कधी तापमान वाढीचा इशारा देण्यात येत आहे. यामुळे शेतकर्यांसह सामन्य माणूस देखील चक्रावला आहे. पेरण्या लांबल्याने नगरची बाजारपेठ ठप्प होण्याची परिस्थिती आहे. ऐनपेरणी काळात शेतकर्यांनी बियाणे खरेदीकडे पाठ फिरवल्याचे व्यापारी सांगत आहे. पाऊस लांबल्यास त्याच्या बियाणे बाजारपेळेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 30 जूनपर्यंत मूग आणि उदिड यासह काही कडधान्य पिकांच्या पेरणीचा कालावधी असून या कालवधीत या पिकांची पेरणी न झाल्यास या पिकांचे क्षेत्र दुसर्या पिकांकडे वळत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे मूग, उदिडाऐवजी सोयाबीन, कापूस, तूर आणि चारा पिकांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.
बियाणे बाजार ठप्प
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 70 हजार 500 क्विंटल बियाण्याची मागणी कृषी विभागाच्यावतीने महाबिजसह अन्य खासगी कंपन्यांकडे करण्यात आली होती. यात 15 हजार क्विंटलच्या जवळपास बियाणांचा पुरठवा झालेला आहे. मात्र, पाऊस नसल्याने नगरसह जिल्ह्यातील प्रमुख बाजारापेठेत बियाणे विक्री ठप्प आहे. कृषी विभागासह हवामान खात्याकडून सातत्याने पावसाचा अंदाज बदलत असल्याने आता शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विहिरी बागायत भागात कपाशी लागवडी सुरू असून जिल्ह्यातील खरीप हंगामाची पेरणी नग्ण आहेत. आता पुढील आठवड्यात पावसाची शक्यता असून दमदार पाऊस झाल्यास त्यांनतर पेरण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व पावसावर अवलंबून आहे.
पूरेशा पावसानंतर पेरणीचे आवाहन
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी अद्याप पुरेशा आणि मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान शेतकर्यांनी 60 मिलीमीटर अथवा त्यापेक्षा जादा पाऊस झाल्यानंतर पिकांची पेरणी करावी. त्यापेक्षा कमी पावसावर पेरणी करू नये. गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा कडका वाढला असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी तापेलेल्या आहेत. मुळे पुरेशा पाऊस होवून जमिनी थंड न होता पेरणी केल्यास त्याचा थेट उगवण क्षमतेवर होणार असल्याने शेतकर्यांनी काळजी घेण्याच्या आवाहन कृषी विभागाने केले आहे.