Sunday, May 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, नेवाशात पावसात मोठी घट

श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, नेवाशात पावसात मोठी घट

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात यंदा पावसाने बर्‍यापैकी हात आखडता घेतला. सरासरीच्या तुलनेत यंदा 73.7 टक्केच पाऊस झालेला असून त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. विशेषत: उत्तर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर आणि नेवासा तालुक्यात सरासरीच्या 55 ते 22 टक्के पावसाची घट आहे. यामुळे या तालुक्यात पुढील महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा राहणार आहेत. दुसरीकडे दक्षिणेतील पारनेर, नगर, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव यासह उत्तरेतील अकोले तालुक्यात सरासरीच्या 106 ते 91 टक्के पावसाची नोंद आहे.

- Advertisement -

यंदा जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाचा मोठा खंड पाहावयास मिळाला. जून महिन्यांत जेमतेम पाऊस झाला. जुलैनंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पावसाचा मोठा खंड होता. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या कालावधीत जिल्ह्यात टप्प्याने सर्वदूर पावसाची नोंद झाली. विशेष नगर शहर आणि तालुक्यातील काही भागात आणि पारनेर तालुक्यात अनेक ठिकाणी कमी कालावधीत जादा पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, पावसाचा हा कालावधी कमी होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आणि ऑक्टोबरच्या सुरूवातीलाच अनेक ठिकाणी पहाटे पासून धुके पडण्यास सुरूवात झाली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने परतीचा पाऊस गेला असल्याचे जाहीर केले.

जिल्ह्यात प्रशासनाकडील आकडेवारीनूसार जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 73.7 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ही 448 मिली मीटरची असून जिल्ह्यात यंदा 417 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्याच्या एकूण पावसाच्या सरासरीत जवळपास 26 टक्क्यांची घट आहे. ही घट काही तालुक्यात 55 टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात विहीरीच्या पाण्याची शाश्वती कमी असून पाटपाणी असणार्‍या भाग वगळता अन्य ठिकाणी पिकांसोबत चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी ऐन ऑक्टोबर महिन्यांत विहीरीतील पाणी कमी होतांना दिसत असून डिसेंबर-जानेवारीपासून टंचाईच्या झळा वाढणार आहेत.

कमी पावसाचे तालुके

श्रीरामपूर 45 टक्के, राहुरी 57 टक्के, राहाता 66 टक्के, कोपरगाव 69 टक्के, संगमनेर 76 टक्के आणि नेवासा 78 टक्के असा आहे.

सरासरी गाठणारे तालुके

पारनेर 106 टक्के, नगर 100 टक्के, श्रीगोंदा 98 टक्के, अकोले 94 टक्के, पाथर्डी 93 टक्के आणि शेवगाव 91 टक्के यासह कर्जत 85 टक्के आणि जामखेड 85.4 टक्के सरासरीच्या तुलनेत पाऊस झालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या