Thursday, May 23, 2024
Homeनगरपावसाच्या विश्रांतीमुळे मुळा धरणाचा विसर्ग घटला

पावसाच्या विश्रांतीमुळे मुळा धरणाचा विसर्ग घटला

बारागाव नांदूर |वार्ताहर| Baragav Nandur

मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने आता दडी मारल्याने धरणात होणारी नवीन पाण्याची आवक कमी झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळे धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणातून सध्या एक हजार क्युसेसने विसर्ग सुरू असून मुळा धरणातून जायकवाडीला तब्बल 12.5 टिएमसी पाणी गेले आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने थांबा घेतल्याने विसर्ग घटविण्यात आला आहे. 1 हजार क्युसेसने जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरूच आहे. यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो पाण्याचा उच्चांक होऊन जायकवाडी धरणाला 12 हजार 576 दलघफूट पाणी देण्यात आले.

मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कोतूळ पटट्यात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. धरणाच्या बॅकवाटर पटट्यात येणारे राहुरी, पारनेर व संगमनेर पटट्यात पावसाचा धुमाकूळ सुरू होता. परिणामी धरणातून 10 हजार क्युसेस दरम्यान विसर्ग सुरूच होता.

यामुळे मुळा धरणातून जायकवाडी धरणाला सुमारे 12 हजार 576 दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. यासह डावा व उजव्या कालव्यालाही आवर्तन सोडण्यात आले होते. ओव्हरफ्लोचे एकूण 16 हजार दलघफू पाणी धरणातून सोडण्यात आल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखाभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.

दरम्यान, सलग पंधरा दिवस मुळा धरणाच्या बॅक वाटर पटट्यात असलेल्या तिन्ही तालुक्याला पावसाने झोडपले होते. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने पावसाचे पाणी अकरा दरवाजातून मुळा नदीपात्राद्वारे जायकवाडीच्या दिशेने वाहत होते. मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत.

दरम्यान, तीन-चार दिवसांपासून मुळा धरणाच्या बॅकवाटर पटट्यामध्ये पावसाने थांबा घेतल्यानंतर विसर्ग कमी करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी 5 हजार क्युसेसने सुरू असलेला विसर्ग कमी करीत 3 हजार क्युसेस इतका करण्यात आला होता. दरम्यान, पावसाने दडी मारल्याचे पाहून पाटबंधारे विभागाने सोमवारी (दि.28) रोजी विसर्गात घट केली. धरणाचे अकरा दरवाजांमधून 1 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. पावसाने अशीच उघडीप ठेवल्यास विसर्ग बंद केला जाईल, अशी माहिती शाखाभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.

दरम्यान, यंदाच्या मान्सून हंगामात मुळा धरणातून रेकॉर्डब्रेक होऊन ओव्हरफ्लोचे सर्वाधिक पाणी वाहिल्याची नोंद घेण्यात आली आहे. सुमारे 16 हजार दलघफू इतके ओव्हरफ्लोचे पाणी धरणातून सोडण्यात आले. त्यापैकी 12 हजार 576 दलघफू इतके पाणी जायकवाडी धरणाला देण्यात आले. अजूनही जायकवाडीच्या दिशेने पाणी सुरूच आहे.

धरणाचा डावा व उजवा कालवाही सोडण्यात आलेला होता. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांसाठी धरणातून मान्सून काळात 3.5 टिएमसी पाणी खर्च करण्यात आले आहे. धरणसाठा 25 हजार 800 दलघफू इतका ठेवत उर्वरित नवीन आवकचे पाणी सोडले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात 26 हजार दलघफू इतका पूर्ण पाणी साठा ठेवला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या