Thursday, June 13, 2024
Homeनगरपावसाचा ब्रेक! गोदावरीचा विसर्ग बंद

पावसाचा ब्रेक! गोदावरीचा विसर्ग बंद

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

पावसा अभावी गोदावरी नदीतील विसर्ग काल सकाळी 9 वाजता बंद करण्यात आला. दारणा धरणातुन 1400 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात भावलीला 6 मिमी पावसाची नोंद झाली. भाम ला 3 मिमी पावसाची नोंद झाली. अन्यत्र पाऊस नाहीच! धरणांच्या पाणलोटात आणि लाभक्षेत्रातही पावसाने मोठा खंड दिला आहे. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील उभी पिके पावसा अभावी जळून जाण्याच्या स्थितीत आहेत.

कालव्यांचे पाणी बंधारे व तळे भरण्यासाठी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे. तशी मागणी लाभक्षेत्रातुन होत आहे. त्यातच जायकवाडीला पाणी सोडण्याची भिती शेतकरी वर्गात आहे. धरणांमध्ये फारसे समाधानकारक पाणी नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाण्याबाबत शासनाला योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. लाभक्षेत्रात पावसाने पाणी प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गोदावरी नदीतील विसर्ग अखेर काल सकाळी 9 वाजता बंद करण्यात आला आहे. गोदावरीत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन काल सकाळी 6 पर्यंत 6 टिएमसी पाण्याचा विसर्ग 1 जून पासुन करण्यात आला आहे. धरणक्षेत्रातच पाऊस नाही, त्यामुळे धरणांचे सांडवे फारसे वाहिले नाहीत. दारणातुन 4.7 टिएमसी, गंगापूर धरणातुन 47 दलघफू, कडवातुन 258 दलघफू, वालदेवीतुन 128 दलघफू इतकेच पाणी धरणांमधुन वाहिले. या धरणांसाठी असणारे फिडर डॅम मध्ये भाम मधुन 1.5 टिएमसी, भावलीतुन 483 दलघफू पाणी वाहिले. यंदा पावसाने धरणांना खपाटी ठेवले. त्यामुळे लाभक्षेत्राची तहान कशी भागणार हा मोठा प्रश्न आहे.

काल सकाळ पर्यंतचे धरणांचे साठे असे- दारणा 95.86 टक्के (क्षमता 7149 दलघफू- उपयुक्तसाठा 6853 दलघफू), मुकणे 77.98 टक्के (क्षमता 7239 दलघफू – उपयुक्तसाठा 5645 दलघफू), वाकी 64.93 टक्के (क्षमता 2492 दलघफू – उपयुक्तसाठा 1618 दलघफू), भाम 100 टक्के (क्षमता 2464 दलघफू – उपयुक्तसाठा 2464 दलघफू), भावली 100 टक्के (क्षमता 1434 दलघफू – क्षमता 1434 दलघफू), वालदेवी 100 टक्के (क्षमता 1133 दलघफू – उपयुक्तसाठा 1133 दलघफू), गंगापूर 91.30 टक्के (क्षमता 5630 दलघफू – उपयुक्तसाठा 5140 दलघफू), कश्यपी 62.20 टक्के (क्षमता 1852 दलघफू – उपयुक्तसाठा 1152 दलघफू), गौतमी गोदावरी 58.40 टक्के (क्षमता 1868 दलघफू – उपयुक्तसाठा 1091 दलघफू), कडवा 88.92 टक्के ( क्षमता 1688 दलघफू- उपयुक्तसाठा 1501 दलघफू), आळंदी 85.78 टक्के (क्षमता 816 दलघफू – उपयुक्तसाठा 700 दलघफू) असे पाणी साठे आहेत. (1000 दलघफू म्हणजेच 1 टिएमसी पाणी).

नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणात 79.51 टक्के पाणी साठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला तो 95.99 टक्के इतका होता. गोदावरीतुन जायकवाडीच्या दिशेने मागील वर्षी 125 टिएमसी पाणी वाहिले होते. यावर्षी काल पर्यंत ते अवघे 6 टिएमसी इतके आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या