नवी दिल्ली | New Delhi
देशात यंदा मान्सून (Monsoon) चांगला बरसणार आहे. जून महिन्यात देशात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा (Rain) अंदाज आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागातही यंदा चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाचा (IMD ) मान्सून हंगामाचा सुधारित अंदाज मंगळवारी (दि. २७) पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मान्सून हंगामातील सुधारीत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने मान्सून काळातील पावसाच्या अंदाजित टक्केवारीत वाढ केली आहे. एप्रिल महिन्याच्या अंदाजात १०५ टक्के पावसाचा अंदाज होता. सुधारित अंदाजात हवामान विभागाने जून ते सप्टेंबर म्हणजेच मान्सून काळात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला. मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ३२ टक्के तर दुष्काळाची शक्यता फक्त दोन टक्के असल्याचे सुधारीत अंदाजात स्पष्ट केले आहे.
मान्सून काळात देशात सरासरी ८७ टक्के पाऊस पडत असतो. २०२५ च्या मान्सून हंगामात मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. पूर्व मध्य भारतातील राज्यांमध्ये मान्सून हंगामात सरासरी पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये सरासरीच्या ९२ ते १०८ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तसेच बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर राज्यात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.
ला निना, एल निनोची स्थिती नाही
विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमानही सरासरीइतकेच आहे. ते सध्या तटस्थ स्थितीत आहे. ला निना किंवा एल निनोच्या स्थितीत नाही. त्यामुळे मान्सून हंगामातही ही स्थिती कायम राहू शकते. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरकही तटस्थ आहे. हा फरक मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात कमी होण्याची शक्यता असली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
जूनमध्ये उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस
जूनमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा विभागवार अंदाज
विभाग – अंदाज सरासरी पाऊस
कोकण – १०७ टक्क्यांपेक्षा अधिक
मध्य महाराष्ट्र – ११० टक्क्यांपेक्षा अधिक
मराठवाडा – ११२ टक्क्यांपेक्षा अधिक
विदर्भ – १०९ टक्क्यांपेक्षा अधिक