Wednesday, June 26, 2024
Homeनगरअलर्ट थांबेना, पाऊस मात्र येईना; बळीराजाचं काळीजच गेलं अलर्ट मोडवर!

अलर्ट थांबेना, पाऊस मात्र येईना; बळीराजाचं काळीजच गेलं अलर्ट मोडवर!

चांदा | Chanda

- Advertisement -

आज अमुक भागात रेड अलर्ट असून तमुख भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.अशा सततच्या येणार्‍या हवामान अंदाजामुळे बळीराजाच्या आशा रोजच पल्लवीत होत आहेत. मात्र ‘पाऊस तर काय येईना अन् अलर्ट देण्याचे थांबेना…’ अशा परिस्थितीत आता बळीराजाचं काळीजच पावसाअभावी अलर्ट मोडवर आल्याचे चित्र सध्या नेवासा तालुक्यात दिसत आहे.

जून महिना सुरू झाला आणि मागील सारे झाले गेले विसरून बळीराजा पुन्हा एकदा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागला होता. जूनमध्ये एक-दोन दिवस आलेल्या रिमझिम पावसानं यंदाचा पावसाळा चांगला राहील. अशा आशेवर बळीराजांने खरिपाची शंभर टक्के पेरणी करून टाकली. सोयाबीन, कपाशी, बाजरी, तूर, उडीद, मूग आदींसह नगदी पिकांची खरिपात बळीराजाने पेरणी, लागवड केली होती. मात्र झालं भलतंच. जून असा तसा कोरडाच गेला. जुलै पूर्ण कोरडा गेला.त्या पाठोपाठ ऑगस्टही गेला. मात्र पाऊस काय आला नाही. आकाशातले ढगही हटले नाहीत.

रोज ढगाळ वातावरण, पावसाचे चिन्ह, हवामान तज्ञांकडून येणारे रोजचे अंदाज ऐकत ऐकत ऐकत अखेर सप्टेंबरचा मध्य आला मात्र अजूनही नेवासा तालुक्यात चिंब भिजणारा पाऊस आलाच नाही. पेरलेली खरिपाची सगळी पिकं करपून गेली. ऑगस्ट महिन्यातील ढगाळ वातावरण आणि प्रखर ऊन यामुळे पिकांवर रोगांचाही प्रादूर्भाव झाला. फवारे मारत मारत पिकं कशीबशी जगवण्यासाठी बळीराजा आटापिटा करत असताना आता मात्र पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पावसाळ्यातच पडणार्‍या उन्हाळ्याच्या उन्हासारखं ऊन पिकांना मारक ठरत आहे. शेकडो हेक्टर पीक जळून गेले आहे. काही ठिकाणी पिके करपली आहेत. तर काही ठिकाणी रोगांमुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा जोरदार पाऊस होणार आहे. दुष्काळ पडणार नाही, असे तज्ञांकडून येणारे सोशल मीडियावरील मेसेज वाचून बळीराजा मनातली मनात सुखावत होता. मात्र गेली तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने आता मात्र जमिनीतलं पाणीही संपत आले असून अनेक ठिकाणी उद्भव कोरडे पडले आहेत.

नेवासा तालुक्यातील दक्षिणेकडील भाग चांदा, बर्‍हाणपूर, हिंगोणी, सोनई, कांगोणी, खरवंडी, वडाळा, म्हाळस-पिंपळगाव, रस्तापूर, फत्तेपूर, कारेगाव, रांजणगाव, कौठा, शहापूर, बालाजी देडगाव, माका, पाचुंदा, देवगाव, महालक्ष्मीहिवरा, तेलकुडगाव, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, पाचुंदा, शिंगवेतुकाई , घोडेगाव आदी गावांमध्ये पावसाने पूर्णतः दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पूर्णपणे वाया गेला असून बळीराजा चिंतेत आहे.

या परिसरातील बहुतांशी शेतकर्‍यांनी पीक विमे भरले आहेत .ऑनलाईन पीक नोंदणीही केली आहे. मात्र आता शासनाने या परिसरात कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने बळीराजाला आधार देण्याची गरज आहे. त्याचबरोबर पावसाविषयी असणारे दररोजचे अपडेट सोशल मीडियावर देताना पूर्ण खात्री होणे गरजेचे असल्याचे मत बळीराजाकडून व्यक्त होत आहे. या परिसरातील काही भागांमध्ये मुळा उजव्या कालव्याचे पाणी आल्याने निदान पिण्याचा पाण्याचा प्रश्न तरी आता महिनाभरासाठी का होईना मार्गे लागत लागणार आहे. मात्र उजव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांची पळापळ सुरू होणार आहे. चांदा गावच्या तर मागच्या महिन्यातच दोन्ही विहिरी कोरड्याठाक पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिनाभर ग्रामस्थांना प्रचंड कसरत करावी लागली होती. गावातील ग्रामस्थांनी आपल्या इंधन विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या होत्या.

मात्र तरीही पिण्या योग्य पाणी नसल्याने ग्रामस्थांचे या काळात प्रचंड हाल झाले. आता सध्या मुळा उजव्या कालव्याला पाणी आल्याने तुर्तास तरी चांदा ग्रामस्थांसह आसपासच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी थांबला आहे. मात्र दुष्काळ असो वा नसो दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटी आणि संपूर्ण उन्हाळा चांदा गावाला पिण्याच्या पाण्याची भासणारी टंचाई ही नित्याची बाब बनली आहे. यासाठी कायमस्वरूपी योजना करणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. यंदा या परिसरातील शेतामध्ये लाल कांदा कुठेही दिसायला तयार नाही. तर रांगडा कांद्याची रोपे टाकलेली होती.

मात्र प्रचंड उन्हाने आणि पावसाअभावी 60 ते 70 टक्के रोपे जळून गेली आहेत. त्यामुळे यंदा कांदा रडवणार हे नक्की ! शिल्लक असलेला गतवर्षीचा कांदा आर्थिक अडचणीमुळे बळीराजांनी जवळपास विकून टाकला आहे .डाळिंब शेतीही या परिसरात आता कमी होत चालली असून डाळिंबाचे भाव गगनाला भिडले असले तरी उत्पादन मात्र अत्यल्प आहे. अनेक भागात डाळिंब शेती रोगामुळे संपुष्टात येत आहे. तीन महिने कोरडे गेल्यानंतर आता बळीराजाला आस लागली आहे ती श्रीगणेशकृपेची उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सव काळात श्रीगणेशाची कृपा होऊन भरभरून पाऊस झाल्यास निदान आता रब्बीत तरी साधेल! अशी आशा बळीराजाला आहे. त्यामुळे बळीराजाने आता श्रीगणेशाचा धावा सुरू केला आहे.गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस पडू दे! अशी आर्त विनवणी गणपतीबाप्पाला बळीराजांनी केली आहे.

हवामान तज्ञांकडून येणारे अंदाज हे या परिसरात पूर्णतः फेल गेले आहेत. सोशल मीडियावर येणार्‍या अंदाजानुसार आम्ही शेतीचे नियोजन करत होतो. मात्र यावर्षी सर्वच अंदाज फोल ठरल्याने आमचे पीकही वाया जाणार आहेत. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून पीक विमा तातडीने द्यावा. बदलत्या वातावरणामुळे अंदाजावर आता किती भरोसा ठेवावा हेच कळायला मार्ग नाही.

– संतोष तांबे, शेतकरी, देडगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या