पुणे | प्रतिनिधी
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ आणि कमी दाबाचे क्षेत्र तसेच दक्षिण कर्नाटकजवळील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २० ते २३ मे दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह (ताशी ५०-६० किमी वेग) आणि विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये पुढील ४-५ दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ जारी
महाराष्ट्रात येत्या २० ते २५ मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असून, २० मे रोजी दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोकणासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मासेमार आणि बंदरांना इशारा
समुद्रात वादळी हवामान अपेक्षित असल्याने मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कोकण किनारपट्टीवर २१ आणि २४ मे रोजी, तर दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर २० ते २४ मे दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३५ ते ४५ किमी पर्यंत राहू शकतो, जो ५५ किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व बंदरांवर ‘लोकल कॉशनरी सिग्नल क्रमांक ३ (LC III)’ लावण्यात आले आहेत, कारण वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रतितास राहून तो ६५ किमी प्रतितास पर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळे समुद्र खवळलेला राहील.