मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘राज कपूर जीवन गौरवपुरस्कार'(Rajkapur Jivangaurav Puraskar ) तसेच ‘व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार'(V. Shantaram Jivangaurav Puraskar ) यांची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार( Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) यांनी गुरुवारी केली.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
यापूर्वी राज कपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी ५ लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे होते.आता यापुढे या पुरस्काराचे स्वरुप १० लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असेल. याशिवाय राज कपूर आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप यापूर्वी ३ लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते.
आता या पुरस्काराचे स्वरुप ६ लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एका आयोजित कार्यक्रमात लवकरच सन २०२०, २०२१ आणि २०२२ असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरीत केले जातील, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’, ‘व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची बैठक आज ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या बैठकीला मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्यासह दोन्ही पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, दिग्दर्शक मधुर भांडारकर, राजदत्त, चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी उपस्थित होते.