मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा आज (रविवारी) पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी पक्षातील विविध नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भाषण केले. यावेळी बोलतांना राज ठाकरे यांनी महाकुंभमेळा आणि गंगा नदीतील पाण्याबाबत थेट विधान केले.
त्यांनी केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर माणसं-बाया अंग घासून अंघोळ करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत. मला सांगा कोण पिणार ते पाणी, असे विधान राज ठाकरेंनी केले. त्यांच्या या विधानावर आणि एकंदरितच त्यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कौतुक केले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “अधूनमधून राज ठाकरे खरं बोलतात. कुंभमेळ्याच्या संदर्भाने देशातील नद्यांचे पाणी आणि स्वच्छता प्रकल्पाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका दुर्दैवाने खरी आहे. ती प्रबोधनकारांच्या डोळस हिंदुत्वाशी सुसंगत आहे. तेव्हा त्याचा विपर्यास करण्यापेक्षा मोदी भक्तांनी आत्मचिंतन करावे.” त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका किती जणांना पटली आणि किती जणांना नाही पटली, हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच कळेलच.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
‘मुंबईत त्या दिवशी बैठक ठेवली होती. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर झाले नाहीत. मग हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभला गेला होतो सांगितलं. त्यांना म्हटलं मग गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर आंघोळ केलीस का हेदेखील विचारलं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत. आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी?,” अशी खिल्ली राज ठाकरेंनी उडवली.
‘आताच करोना गेला आहे. कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. दोन वर्षं तोंडाला फडके बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करत आहेत. मी कित्येक स्विमिंग पूल पाहिले आहेत, जे उद्घाटनाला निळे होते नंतर हिरवे झाले. कोण जाऊन त्या गंगेत पडणार आहे. त्याने तिथे काय केलं, मी इथे पितोय. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही”.”या देशातील एक नदी स्वच्छ नाही. आम्ही काय नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा स्वच्छ नद्या पाहतो. ते काय तिथे माता म्हणत नाहीत, तरी नदी स्वच्छ असते. आमच्याकडे सगळं प्रदूषणाचं पाणी नदीत जातं. कोणी आंघोळ करतं, कोणी कपडे धुतं, जे वाटेल ते चालू असल्याचे राज ठाकरे म्हणाले.