मुंबई । Mumbai
राज्यातील शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्याच्या निर्णयावरून सध्या राज्याचे वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) याला तीव्र विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी काल ट्विटरवरून आपली भूमिका स्पष्ट करत या निर्णयाला विरोध दर्शवला.
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक होत राज्य शासनाच्या निर्णयाचे प्रतीकात्मक दहन केले. अनेक ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन “आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही” असे लिहिलेले फलक झळकावले. यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “शाळांना टार्गेट करणं हे विदारक आहे. विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त भाषा शिकण्याची संधी मिळतेय, हे स्वागतार्ह आहे. पण यावरून राज ठाकरे जे वागले, ते तालिबानी पद्धतीसारखं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. तसंच, “राज ठाकरेंना कायद्याची जाण आहे की नाही, यावरच शंका आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नीट न वाचता त्यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी हा विरोध उभा केला आहे,” असंही ते म्हणाले.
सदावर्ते यांनी मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर देखील टीका केली. “शासन निर्णयाचे दहन करणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. न्यायालयाने फलक लावण्यावर बंधन घातले असताना देखील नियम तोडण्यात आले,” असं ते म्हणाले. “‘आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही’ असे फलक लावणे हे समाजात फूट पाडणारे कृत्य आहे. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा,” अशी ठाम मागणी सदावर्ते यांनी केली.
संपूर्ण प्रकरणावर मनसेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता पक्ष लवकरच यावर आपली भूमिका अधिक स्पष्ट करेल, अशी शक्यता आहे. या वादामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे हिंदी भाषेच्या सक्तीला समर्थन देणारे गट आहेत, तर दुसरीकडे त्याला विरोध करणाऱ्या संघटना आणि राजकीय पक्ष जोरदार आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भाषिक अस्मितेचा मुद्दा पुढे आला आहे. यापुढे यावरून काय घडामोडी होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.