मुंबई । Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 2024 मध्ये झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्यादृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
ठाकरेंनी पक्षाच्या रचनेत आता बदल केले असून नव्या रचनेनुसार, संदीप देशपांडे यांच्याकडे मुंबई शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर युवानेते अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी (ता. 23 मार्च) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर याबाबतची माहिती राज ठाकरेंकडूनच प्रसार माध्यमांसमोर देण्यात आली.
माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, आज झालेल्या बैठकीत मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शीव या भागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. तसंच गोरेगावकडील भागाची जबाबदारी कुणाल माईणकर आणि पूर्वेकडच्या भागाची योगेश सावंतांकडे देण्यात आली आहे.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा 30 मार्चला होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर हा मेळावा होईल. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.